मोदी दादा, स्वच्छतादूत बनवलं, आता काम दे !

भगवान खैरनार
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

‘मोदी दादा मला स्वच्छतादूत बनवलं हे तू चांगलं केलं; परंतु मला काम दिलं नाही. काम दिलं असतं, तर मला माझ्या लहान लहान मुलांना कामासाठी बाहेरगावी घेऊन जावं लागलं नसतं. म्हणून आता तू मला काम दे,’ या शब्दांत त्यांनी पंतप्रधानांकडे रोजगाराची मागणी केली आहे.  

मोखाडा : दुपारच्या रणरणत्या उन्हात सात महिन्यांची गर्भवती हातात पहार घेऊन खड्डा खणते. तीन दिवस सलग काम करून ती हा खड्डा पूर्ण करते... पुढच्या चार दिवसांत या शोष खड्ड्यावर शौचालय उभे राहतं, हे सर्व करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्‍यातील नांदगाव या छोट्याशा गावातली जिद्दी महिला सुशीला खुरकुटे. २०१७ मध्ये पालघर जिल्हा स्वच्छता अभियानाच्या त्या स्वच्छतादूत झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शक्ती अवार्ड देऊन त्यांचा सन्मानदेखील करण्यात आला. त्यामुळे साहजिकच सरकार लक्ष देईल, असं त्यांना वाटतं होतं; परंतु मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे त्यांचे कुटुंब आजही रोजगारासाठी भटकत आहे. त्यांनी कामासाठी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच साकडं घातलं आहे. ‘मोदी दादा मला स्वच्छतादूत बनवलं हे तू चांगलं केलं; परंतु मला काम दिलं नाही. काम दिलं असतं, तर मला माझ्या लहान लहान मुलांना कामासाठी बाहेरगावी घेऊन जावं लागलं नसतं. म्हणून आता तू मला काम दे,’ या शब्दांत त्यांनी पंतप्रधानांकडे रोजगाराची मागणी केली आहे.  

गावातल्या इतर महिलांप्रमाणे सुशीला यांना उघड्यावर शौचालयाला जावं लागायचे. त्यांनी स्वच्छ भारत अभियानाबद्दल ऐकले. घरात शौचालय असायला हवे, त्यातून स्वच्छता राहील आणि आपल्या कुटुंबाचे, मुलांचे आरोग्यही जपता येईल, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार तिला मनोमन पटले. मजूर लावून खड्डा खोदण्याइतपत सुशीलाकडे पैसे नव्हते आणि मदतीला पतीला घ्यावे, तर रोजगार बुडणार. मग सुशीला यांनी स्वतःच पहार घेऊन काम सुरू केले. याच दरम्यान ‘युनिसेफ’चे सल्लागार जयंत देशपांडे तिथून जात असताना त्यांनी सुशीला यांचा काम करताना फोटो काढला. राज्याच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे सचिव राजेश कुमार यांनी याची दखल घेत सुशीलाबाईंचे नाव केंद्र सरकारकडे धाडले. 

केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता सचिव परमेश्‍वर अय्यर यांनी तो ट्‌विट केला आणि चक्रे फिरली. मोदी सरकारने सुशीला यांना तत्काळ मदत करत त्यांचे शौचालय बांधून पूर्ण केले, शिवाय त्या गावातल्या इतर महिलांचे प्रेरणास्थान व्हावे, म्हणून पंतप्रधान मोदींनी त्यांना स्वच्छतादूत बनवले. संपूर्ण पालघर जिल्ह्याच्याच त्या ‘स्वच्छतादूत’ झाल्या. 

पंतप्रधान कार्यालयाने सुशीलाबाईंच्या कामाची नोंद घेतली. महाराष्ट्रातून पाठवलेल्या नावांमधून त्यांना राष्ट्रीय पातळीवर शक्ती सन्मानासाठी निवडले. गुजरातमधील गांधीनगर येथे ८ मार्च २०१७ रोजी महिला दिनी खुद्द पंतप्रधानांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला. सुरुवातीला त्या अनेक वेळा माध्यमांसमोर झळकल्या; परंतु माध्यमांसमोर झळकल्यानं वीतभर पोटाची टीचभर खळगी थोडीच भरणार होती. त्यामुळे तिचा हा सन्मान सत्कार सोहळा पुरस्कारापुरताच मर्यादित राहिल्याचं म्हणावं लागेल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dear modiji, give me job as well us made me swachhatadoot