स्टुडंस्ट्स चला तयारीला लागा...! लवकरच राज्यातील कॉलेज सुरू होणार

तेजस वाघमारे
Thursday, 21 January 2021

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर महाविद्यालयेही सुरू करण्याबाबत तयारी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सुरू केली आहे. त्यानुसार राज्यातील विभागवार आढावा घेण्यात आला आहे.

मुंबई  : लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर महाविद्यालयेही सुरू करण्याबाबत तयारी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सुरू केली आहे. त्यानुसार राज्यातील विभागवार आढावा घेण्यात आला आहे. या वेळी 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा विचार आहे. याबाबत या महिनाअखेरपर्यंत निर्णय अपेक्षित असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. 

लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारने ऑनलाईन स्वरूपात शिक्षण सुरू केले. परंतु विज्ञान, अभियांत्रिकी शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षण घेणे आवश्‍यक आहे. तसेच पीएच.डी., पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ऑफलाईन मार्गदर्शन, सर्वेक्षण, निरीक्षण करणे आवश्‍यक असते. यामुळे या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालये सुरू करण्याची मागणी सर्व स्तरांवरून होत आहे. शाळा सुरू होऊ शकतात; तर महाविद्यालये का नाही, असा सवालही प्राध्यापक संघटनांकडून करण्यात येत आहे. 

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना विचारले असता त्यांनी महाविद्यालये सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. याबाबत लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून ज्या प्रमाणे टप्प्याटप्प्याने शाळा सुरू केल्या, तशाच पद्धतीने महाविद्यालयेही सुरू करण्याचा आमचा विचार आहे. यात 50 टक्के उपस्थितीत महाविद्यालये सुरू होऊ शकतात का? नेमकी काय काळजी घ्यावी लागणार आहे, याबाबत आम्ही अभ्यासही केला आहे. यामुळे लवकरच निर्णय होईल असे सामंत म्हणाले. 

 

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीचे लाभ 
राज्यात सध्या जातपडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यात विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटनांकडून प्रवेशासाठी आवश्‍यक प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी आणखी मुदतवाढ मागत आहेत. यामुळे हे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज केले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केल्यावर त्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीचे लाभ देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार अशा विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

The decision to start colleges soon 50 percent attendance condition

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The decision to start colleges soon 50 percent attendance condition