टीएमटीच्या प्रवासी संख्येत घट 

टीएमटीच्या प्रवासी संख्येत घट 
Updated on

ठाणे : ठाणे महापालिकेची परिवहन सेवा असलेल्या टीएमटी बसचा कारभार रडतखडत सुरू असून मागील दोन वर्षांच्या तुलनेत प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असून तुलनेने अपघात मात्र दुपट्टीने वाढले आहेत.

2017-18 या आर्थिक वर्षात टीएमटीचे 2 लाख 37 हजार 324 प्रवासी होते. तर, वर्षभरात 21 अपघात घडले होते. 2018-19 या आर्थिक वर्षात हीच संख्या 1 लाख 76 हजार 683 इतकी नोंदवली गेली. त्या तुलनेत वर्षभरात 58 अपघात झाल्याची नोंद ठाणे महापालिकेच्या पर्यावरण अहवालात नमूद करण्यात आली आहे. एकीकडे स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवायचा अन्‌ सार्वजनिक बस सेवेकडे दुर्लक्ष करायचे, अशी टीका प्रवासी वर्गातून होत आहे. 

ठाणे महापालिकेच्या मालकीची टीएमटी सेवा 1989 पासून सुरू झाली. टीएमटीच्या ताफ्यात आजघडीला एकूण 477 बस असून त्यापैकी जेमतेम 270 बसेस दररोज 102 मार्गांवर धावतात. यातील बहुतांश बस कंत्राटी असून या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या 10 "तेजस्विनी' बसचा समावेश आहे.

कुठलेही वेळापत्रक नसलेल्या टीएमटीचा प्रवास रडतखडत सुरू असल्याने प्रवासीवर्गातून अनेक तक्रारी येत असतानाच यंदाच्या आर्थिक वर्षात प्रवासी संख्येत मागील दोन वर्षांच्या तुलनेत घट झाल्याचे दिसून येत आहे. यंदा लोकसंख्या 25 लाखांच्या घरात पोहचली असतानाही 2018-19 या आर्थिक वर्षात प्रवासी संख्या घटून 1 लाख 76 हजार 683 इतकी नोंदल्याचे समोर आले आहे. 

त्याचबरोबर, शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण आणि कॉंक्रीटीकरण होण्यासह अनेक नवीन मार्ग निर्माण झाले असतानाही मागील दोन आर्थिक वर्षांच्या तुलनेत बसच्या अपघातांमध्ये वाढ झाल्याची कबुली स्वतः महापालिकेने दिली आहे. महापालिकेच्या पर्यावरण अहवालाच्या लेखी 2016-17 या वर्षात 28 अपघात घडले असून दोघांचा मृत्यू ओढवला आहे. 2017-18 मध्ये 21 अपघात घडले असून 2018-19 मध्ये दुप्पटीहुन अधिक म्हणजेच 58 अपघात घडले आहेत. यात एकच व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे अहवालात दर्शवण्यात आले आहे. 

अपघातांच्या माहितीबाबतही विसंगती 
बेस्टच्या तुलनेत ढिम्म कारभार असलेल्या टीएमटीकडे नेहमीच तक्रारींचा पाऊस पडत असतो. सॅटीसवरील थांब्यावर चिंचोळ्या चौकीत बसून शेकडो बसचे संचलन कसेबसे पार पाडले जाते. एखाद्या प्रवाशाची तक्रार आल्यास केवळ नोंदवहीत टिपण घेतले जाते. 2017 मध्ये 172, 2018 मध्ये 265 तर 2019 मध्ये 109 तक्रारी प्राप्त झाल्या असतानाही कार्यवाही शून्य असल्याचे दिसून येते. तर, अपघातांच्या माहितीबाबतही विसंगती आढळून येत आहे. तीन वर्षात 150 हुन अधिक किरकोळ व गंभीर अपघात घडले असतानाही टीएमटीच्या स्त्रोतांकडून अहवालात केवळ 107 अपघात घडल्याचे नमूद केले आहे. 

वर्ष                 प्रवासी संख्या 
2016-17    1 लाख 82 हजार 256 
2017-18    2 लाख 37 हजार 324 
2018-19    1 लाख 76 हजार 683 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com