esakal | उपायुक्त किरणराज यादव यांच्या बदलीची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

उपायुक्त किरणराज यादव यांच्या बदलीची मागणी

नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांनी उपायुक्त किरणराज यादव यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी केली आहे. यासाठी १२०० कर्मचाऱ्यांच्या सह्यांचे निवेदन नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांना देण्यात आले आहे.

उपायुक्त किरणराज यादव यांच्या बदलीची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : मागील दोन वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त (प्रशासन) किरणराज यादव कर्मचाऱ्यांप्रती कुठलेही काम करत नाहीत. त्यांच्या या नाकर्तेपणाबाबत या अगोदरही नगरविकास खात्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांच्या वागणुकीत कुठलाही बदल झाला नसल्याचा आरोप करत नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांनी उपायुक्त किरणराज यादव यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी केली आहे. यासाठी १२०० कर्मचाऱ्यांच्या सह्यांचे निवेदन नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांना देण्यात आले आहे.

नवी मुंबई महापालिकेचे प्रशासन उपायुक्त किरणराज यादव हे प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या संबंधित कुठलीही कामे करत नाहीत. मागील दोन वर्षांपासून कोणत्याही संवर्गाची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केलेली नाही. सेवा पुस्तकात अतिरिक्त शिक्षणाची नोंद केली नाही. १७ ते २५ वर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यात दिरंगाई, ७५ टक्के कर्मचाऱ्यांना एकाच ठिकाणी तीन वर्षांपेक्षा कालावधी होऊनही बदली करण्यात आली नाही. आश्‍वासित प्रगती योजनेच्या कामात दिरंगाई, अनेक जागा रिकाम्या असूनही पदोन्नती नाही. पदोन्नती झालेल्या कर्मचारी-अधिकारी वर्गास नवीन वेतनश्रेणी लागू नाही. कर्मचाऱ्यांसोबत उद्धटपणे वागणे, अशा तक्रारी कर्मचाऱ्यांनी निवेदनात नमूद केल्या आहेत. उपायुक्त किरणराज यादव यांच्या या आडमुठेपणामुळे सर्व कर्मचारी त्रस्त आहेत. 

त्यांच्या या वागणुकीमुळे या अगोदरही त्यांच्याविरोधात उपोषण आंदोलने झाली आहेत. मात्र त्यांनी आपल्या कार्यशैलीत कोणताही बदल केलेला नाही. उलट आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी कर्मचाऱ्यांना अधिक त्रास देण्यास सुरुवात केली आहे. असा आरोप करत मनपा कर्मचाऱ्यांनी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांना १२०० कर्मचाऱ्यांच्या सह्यांचे निवेदन देऊन उपायुक्त किरणराज यादव यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, एखाद्या अधिकाऱ्याविरोधात एवढ्या कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन तक्रार करण्याची महापालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे नगरविकास खाते किरणराज यादव यांच्या बाबतीत काय भूमिका घेते, याकडे नवी मुंबई पालिका कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी आणि अधिकारी वर्गाने एकत्रित येऊन उचललेले हे पाऊल म्हणजे प्रशासनाचे दुर्दैव आहे. पालिकेच्या इतिहासात हे प्रथमच घडत आहे. याबाबत आमच्याकडेही निवेदनाची प्रत प्राप्त झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या भावनांचा आदर करून यादव यांची बदली झाली नाही तर या विरोधात नवी मुंबई महापालिका कर्मचारी, अधिकारी संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल.
- विजू पाटील, अध्यक्ष, नवी मुंबई महापालिका कर्मचारी अधिकारी संघटना.

loading image
go to top