डेंगीमुळे 15 दिवसांत 465 रुग्ण दाखल

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

मुंबईत डेंगीचा प्रादुर्भाव वाढत असून, ऑगस्टमध्ये 15 दिवसांत डेंगीचे 465 रुग्ण पालिकेच्या विविध रुग्णालयांत दाखल झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबई: मुंबईत डेंगीचा प्रादुर्भाव वाढत असून, ऑगस्टमध्ये 15 दिवसांत डेंगीचे 465 रुग्ण पालिकेच्या विविध रुग्णालयांत दाखल झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. पावसाने उसंत घेतल्याने साथीच्या आजारांत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेच्या सर्व रुग्णालयांमधील साथीच्या रोगांचे वॉर्ड तुडुंब झाल्याचे आढळून येत आहे.

मलेरिया व गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मुंबईत झालेला मुसळधार पाऊस आणि त्यानंतरची उघडीप यामुळे साथरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ताप, थंडीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. 15 दिवसांत मलेरिया व गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या 460 पर्यंत पोहोचली आहे. डेंगीचा प्रादुर्भाव वाढल्याचेही आढळून आले आहे. महापालिकेच्या आरोग्य खात्याच्या वतीने साथरोगांवर उपाययोजना करण्यात येत असून, विभागवार पथके तैनात करण्यात आली आहेत.

रोग रुग्णसंख्या (15 दिवसांतील संख्या)
मलेरिया 259
स्वाईन फ्लू 15
कावीळ 24
गॅस्ट्रो 200
डेंगी 465
----------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dengue fever alert in mumbai