वरळी एनएससीआय केंद्रात कोरोनाच्या उपचारांसोबत दातांवरही उपचार

भाग्यश्री भुवड 
Sunday, 20 September 2020

गेल्या सहा महिन्यांपासून दातांच्या संबंधित उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आपली दवाखाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे, दातांच्या समस्या असणाऱ्या रुग्णांचे हाल झाले आहे. याच कारणास्तव वरळी एनएससीआय केंद्रात कोरोना उपचारांसोबत दातांच्या विकारांवर उपचार देण्याची सुविधा सुरू केली आहे.

मुंबई : दातांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कोरोनाचा सर्वात जास्त धोका असल्याचे समोर आले आहे. यामुळे अजूनही अनेक ठिकाणी दातांचे दवाखाने बंद आहेत. मात्र, कोरोना रुग्णांनाही दातांच्या समस्या जाणवत असल्याने वरळीच्या एनएससीआय या कोरोना उपचार केंद्रात आता दातांवरही उपचार केले जात आहेत. 

गेल्या सहा महिन्यांपासून दातांच्या संबंधित उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आपली दवाखाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे, दातांच्या समस्या असणाऱ्या रुग्णांचे हाल झाले आहे. याच कारणास्तव वरळी एनएससीआय केंद्रात कोरोना उपचारांसोबत दातांच्या विकारांवर उपचार देण्याची सुविधा सुरू केली आहे. शिवाय, पोस्ट कोविड ओपीडीतही दातांचे डाॅक्टर्स दात दूखीवर उपचार देत आहेत. 

देशात उद्भवलेल्या कोरोना (कोवीड -19 ) या विषाणूच्या प्रसारावर आळा बसावा, यासाठी दंतवैद्य क्षेत्रातील डॉक्टरांनी अनावश्यक आणि तातडीच्या नसलेल्या दंत सेवा बंद ठेवाव्यात. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीत सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना भारतीय दंत संघटनेचे (इंडियन डेंटल असोसिएशन) अध्यक्ष डॉ. रविंद्र सिंह यांनी दंतवैद्य चिकित्सकांना दिल्या होत्या. त्यानंतर, राज्यात कठोर संचारबंदी लागू करण्यात आली.

सरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन करत मुंबईतील अनेक खासगी आणि पालिकेच्या अख्त्यारितीत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये सध्या रुग्ण सेवा कमी करण्यात आली आहे. याचा आता फटका ही बसू लागला आहे. शिवाय, ही परिस्थिती मे महिन्यात पूर्वपदावर येईल असे वाटले होते. मात्र तसं झालं नाही आणि त्याचा परिणाम म्हणून मुंबईत दात दुखीच्या समस्या वाढलेल्या दिसत आहेत.

कॉन्टॅक्टलेस उपचार

सध्या वरळी एनएससीआय केंद्रात दात दुखीच्या समस्येवर फक्त औषधं दिली जात आहेत, आणि समुपदेशन ही केले जात आहे. मात्र, पुढच्या काही दिवसांत रुग्णालयात ज्या पद्धतीने उपचार दिले जातात. त्याच पद्धतीने उपचार देण्याची सुविधा सुरू केली जाणार आहे. एक डेंटीस्ट खुर्ची तसेच मशीन्सही आणल्या जाणार आहेत. संपूर्णपणे कॉन्टॅक्टलेस उपचार केला जाईल. म्हणजेच कोरोना रुग्णाच्या संपर्कात न येता काचेच्या साहाय्याने ग्लोव्हजचा वापर करून हे उपचार केले जातील. सुरक्षात्मक पीपीई किट्स घालूनच ही सेवा दिली जात आहे. पाच जणांची टिम ही सेवा देत आहे. लवकरच पूर्ण उपचार दिले जातील. असे दंत वैद्यक डाॅ. कल्याणी तांबवेकर म्हणाल्या.  

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dental treatments with corona are performed at the NSCI Center in Worli