अजित पवार यांच्या बंडखोरीचा सात बारा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

  • अजित पवारांचा इतिहास बंडखोरीचाच..
  • या आधीही केलंय वारंवार बंड..
  • अजित पवारांमुळे राष्ट्रवादी वारंवार अडचणीत..

अजित पवार.. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिला जाणारा चेहरा. पण हा चेहरा आज अवघ्या महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आलाय. पण हा चेहरा आता बंडखोरीचा चेहरा म्हणून ओळखला जाईल. कारण, अजित पवारांची बंडखोरीची ही पहिलीच वेळ नाही.

 

  • 2009 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आली तेव्हा अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या यंग ब्रिगेडचा पाठिंबा असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्रिपदावर दावा केला होता. मात्र, हे बंड थंड झालं.
  • 2009 लाच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवारांनी पुण्याचे काँग्रेस उमेदवार सुरेश कलमाडी यांच्या प्रचारास नकार दिला होता. अखेर शरद पवारांनी पुढाकार घेऊन कार्यकर्त्यांना प्रचारासाठी तयार केलं होतं. 
  • त्यानंतर  2012 मध्ये अजित पवार यांनी तडकाफडकी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. सिंचन घोटाळ्याच्या आरोपामुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनीही राजीनामे दिल्यानं पेच निर्माण झाला होता. दरम्यान निष्पक्ष चौकशीसाठी त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवारांचा राजीनामा स्वीकारला आणि हे बंडही थंड झालं.
  • दोनच महिन्यांपूर्वी अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर ते नॉट रिचेबल झाले. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचं आणि गायब होण्यामागचं गूढ वाढलं होतं. मात्र, यावेळीही शरद पवारांशी त्यांची चर्चा झाली आणि ते स्वतःच पत्रकार परिषदेला सामोरे गेले. राजीनाम्याचं कारण दिलं ते मात्र वेगळंच होतं. शरद पवारांचं नाव माझ्यामुळे ईडीच्या आरोपपत्रात आल्यानं उद्विग्नतेतून राजीनामा दिल्याचं ते म्हणाले.
  • राज्यात विधानसभेचे निकाल लागल्यानंतर सत्तास्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठका सुरू झाल्यानंतरही अजित पवारांनी असाच धक्का दिला होता. शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानातून 13 नोव्हेंबरला ते अचानक निघून गेले. पत्रकारांना त्यांनी बारामतीला जातोय, असं ते म्हणाले. त्यावरून पुन्हा चर्चा सुरू झाल्या. मात्र, काही वेळातच ते दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठकीत दिसले.
  • त्यानंतर अगदी कालपर्यंत चर्चांच्या फेऱ्या सुरू असताना अजित पवारही दिसायचे. मात्र, इतका मोठा निर्णय घेतील, अशी कल्पना केलेली नसतानाच, त्यांनी भाजपसोबत जाण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आणि आपल्या बंडखोरीच्या स्वभावावर पुन्हा शिक्कामोर्तब केलं.

Webtitle : details of ajit pawars history being rebel

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: details of ajit pawars history being rebel