esakal | आवाजावरून होणार कोरोनाचे निदान; नेस्कोच्या कोव्हिड सेंटरमध्ये लवकरच प्रयोग
sakal

बोलून बातमी शोधा

आवाजावरून होणार कोरोनाचे निदान; नेस्कोच्या कोव्हिड सेंटरमध्ये लवकरच प्रयोग

व्यक्तीच्या ध्वनी लहरींवरुन म्हणजेच आवाजावरून कोरोनाचे निदान करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. येत्या 1 सप्टेंबरपासुन गोरेगाव येथील नेस्को कोव्हिड सेंटरमधील रुग्णांवर हा प्रयोग केला जाणार आहे. 4 भाषांत ही चाचणी केली जाणार आहे.

आवाजावरून होणार कोरोनाचे निदान; नेस्कोच्या कोव्हिड सेंटरमध्ये लवकरच प्रयोग

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई :  व्यक्तीच्या ध्वनी लहरींवरुन म्हणजेच आवाजावरून कोरोनाचे निदान करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून गोरेगाव येथील नेस्को कोव्हिड सेंटरमधील रुग्णांवर हा प्रयोग केला जाणार आहे. 4 भाषांमध्ये ही चाचणी केली जाणार आहे.

व्होकलिस हेल्थ अँड इनोव्हंट हेल्थकेअर आणि पालिका यांच्यात शनिवारी याबाबतचा सामंजस्य करार झाला आहे. करारावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या ऑनलाईन स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या आहेत. 

मुंबईतील मराठी चित्रपटांच्या हक्काचे 'सेंट्र्ल प्लाझा' होणार इतिहासजमा; आर्थिक संकटामुळे बंद करण्याचा निर्णय

आवाजाच्या चाचणीमुळे व्यक्ती कोरोना बाधित आहे की नाही, हे 30 सेकंदात समजू शकणार आहे. या चाचणीत जे पॉझिटिव्ह आढळतील त्यांचे आरटीपीसीआर चाचणीने निदान पक्के केले जाईल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन 2000 व्यक्तींवर अभ्यास केला जाईल. या सर्व प्रक्रियेला किमान दोन ते तीन महिने लागतील, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.  

हिंदी, मराठी, इंग्रजी आणि गुजराती या चार भाषांमध्ये ही चाचणी केली जाणार आहे. प्रत्येक भाषेचे वेगवेगळे आवाज आहेत. त्यामुळे, भारतीयांच्या आवाजातील आणि भाषांमधील माहिती त्या उपकरणात भरली जाणार आहे. कोव्हिड रुग्णांचे सर्व नमुने, लक्षणे, स्वाब रिपोर्ट, एक्स रेदेखील त्या उपकरणात भरली जाणार आहेत. अमेरिका आणि इस्त्राईल सारख्या अनेक देशांमध्येही या चाचणीचा वापर होत आहे. 

कोव्हिड -19 ची लक्षणे दिसू लागल्यानंतर व्यक्तीस श्वास घेण्यास त्रास होतो. या सर्व प्रक्रियेत फुप्फुसाच्या स्नायूंवरही परिणाम होऊन त्यांना सूज येते. त्याचा परिणाम आवाजावर होऊन रुग्ण बोलतो तेव्हा हे बदल जाणवतात. याच बदललेल्या आवाजाला मोजण्यात येतो आणि त्यातून व्यक्तीला कोरोना झाला आहे की नाही, याचे निदान होते. 
- डॉ. नीलम अंद्राडे,
प्रमुख, नेस्को कोव्हिड सेंटर

अशी होईल चाचणी
संशयिताने एका व्हॉईस अ‍ॅप्लिकेशनवर किंवा लॅपटॉपवर काही क्रमांक बोलायचे आहे. आवाजाचे हे नमुने संकलित केले जातील. त्यानंतर, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून 30 सेकंदात अहवाल मिळून व्यक्ती किती जोखमीची आहे, हे कळू शकेल, असे डॉ. अंद्राडे यांनी सांगितले.

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top