डायलिसिस रुग्णांवर सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या डॉक्टरांचे यशस्वी उपचार... 

भाग्यश्री भुवड 
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

एप्रिल महिन्यापासून राज्य सरकारचे सेंट जॉर्ज रुग्णालय हे संपुर्णपणे कोविड रुग्णांसाठी देण्यात आले आहे. त्यामुळे, सर्व कोरोनाबाधित रुग्ण या रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यानुसार 2 मे पासून आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांचे यशस्वीपणे डायलिसिस करण्यास सेंट जॉर्ज रुग्णालयाला यश आले आहे.

मुंबई : राज्य सरकारच्या सेंट जॉर्ज रुग्णालयातून एक दिलासादायक बाब समोर आली आहे. किडनीचे कार्य नीट न चालणाऱ्या रुग्णांना वारंवार डायलिसिसची गरज भासते. अशातच सर्व रुग्णालये कोविड 19 च्या रुग्णांनी भरलेली असताना डायलिसिस रुग्णांनी कुठे जावं ? हा देखील प्रश्न आहे. मात्र, या सर्व परिस्थितीवर मात करत पूर्णपणे कोविड रुग्णालय असणाऱ्या सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या डॉक्टरांनी कोरोनाबाधित आणि किडनीची समस्या असणाऱ्या आतापर्यंत तब्बल 328 रुग्णांचे यशस्वीरित्या डायलिसिस केले आहे. 

एप्रिल महिन्यापासून राज्य सरकारचे सेंट जॉर्ज रुग्णालय हे संपुर्णपणे कोविड रुग्णांसाठी देण्यात आले आहे. त्यामुळे, सर्व कोरोनाबाधित रुग्ण या रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यानुसार 2 मे पासून आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांचे यशस्वीपणे डायलिसिस करण्यास सेंट जॉर्ज रुग्णालयाला यश आले आहे. कोविड रुग्णांचा संसर्ग आणखी तीव्र होऊ नये आणि त्यांची प्रकृती ढासळू नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. 

संसर्ग होऊ नये म्हणून विशेष काळजी... 

डायलिसिस युनिट अर्थात ए.के.डी. म्हणजेच आर्टिफिशीयल किडनी डिविझनची आयसीयूप्रमाणे काळजी घेतली जाते. जे डॉक्टर्स या यूनिटमध्ये जातात. त्यांना पीपीई किट्स आणि सर्व सुरक्षात्मक सुविधा देऊनच आत सोडले जाते. रुग्णांच्या बेडसमध्ये ही अंतर ठेवले जाते. डायलिसिससाठी वापरण्यात येणारी सर्व यंत्रसामुग्री आणि सामानावर ( बायोमेडीकल वेस्ट) कोविडचा जंतू राहण्याची शक्यता असते. त्यामुळें, तिथली प्राधान्याने स्वच्छता केली जाते. रुग्णालयात 10 डायलिसीस मशीन आहेत. दर दिवशी किमान 12 ते 15 कोविड रुग्णांचे डायलिसीस केले जात आहेत. संपुर्ण खबरदारी घेऊनच डायलिसीस केले जातात. या प्रक्रियेत सर्वांची समान भूमिका आणि श्रेय आहे. कारण पीपीई कीट्स घालुन सतत काम करणं हे शक्य होत नाही. त्यामूळे, डॉक्टर्स, नर्सेस, टेक्निशियन, निवासी डॉक्टर्स, ज्येष्ठ डॉक्टर्स आणि चतुर्थ श्रेणी कामगार या सर्वांचा समावेश असतो, असे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले. 

बेड्स रिक्त राहण्याचे प्रमाण वाढले... 

सेंट जॉर्ज हे पूर्णपणे कोविड रुग्णालय आहे. गेल्या चार महिन्यांपासून फक्त कोविड रुग्णांवर येथे उपचार केले जात आहेत. मात्र, आता कोविड रुग्ण येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दररोज 25 ते 30 बेडस रिक्त राहतात. शुक्रवारी दिवसभरात एकूण 24 बेड्स रिक्त होते. 220 बेड्सचे हे रुग्णालय असुन सध्या कोविड रुग्ण येथे उपचार घेत आहेत. 102 व्हेंटिलेटरपैकी 70 आयसीयू बेड्स असुन तिथे देखील व्हेंटिलेटर्स कोविडसाठी दिले आहेत. त्यामुळे, आता गेल्या पाच ते सहा दिवसांपासून रुग्ण येण्याचे प्रमाण कमी झाले असल्याचे ही डॉ. खोब्रागडे यांनी सांगितले.

संपादन- सुस्मिता वडतिले 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dialysis at St.Georges in Mumbai saved the lives of many of Kovids patients