

विवाहितांना आईचे नाव लावण्यात अडचणी!
वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. २१ ः सरकारने १ मेपासून कागदपत्रांमध्ये आईचे नाव लावणे बंधनकारक केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणीचे आदेश दिल्यावर प्रशासनाकडून कार्यवाही सुरू झाली आहे. राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री त्याचबरोबर सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या नेम प्लेटवर वडिलांबरोबरच आईचे नाव लावून या निर्णयाचे समर्थन केले आहे. मात्र विवाहित महिलांनी पुरुषांप्रमाणे आम्हाला आईचे नाव कसे लावता येईल, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
आपल्याकडे पुरुषप्रधान आणि पितृसत्ताक पद्धत आजही कायम असली तरी महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात सर्वात आधी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्यात आले. वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलीला हक्क देण्यात आला. याशिवाय महिला विषयक धोरण राबवण्यातही महाराष्ट्र आघाडीवर आहे. आदिती तटकरे यांनी, महिला व बालकल्याण विभागाचा पदभार घेतल्यानंतर याकरिता विशेष प्रयत्न केले. आईच्या गर्भात आपण नऊ महिने राहतो. आपले पालन पोषण आणि संगोपन आईच करते. त्यामुळे वडिलांबरोबरच आईचाही प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा वाटा असतो. या सर्व गोष्टींचा विचार करून १ मे २०२४ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या सर्व मुलांसाठी आधार आणि पॅनकार्ड यांसारख्या सर्व सरकारी दस्तऐवजांमध्ये आईचे नाव समाविष्ट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या अलीकडील निर्णयानुसार, नेम प्लेट्समध्येही बदल करण्यात आला आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये आईचे नाव समाविष्ट करण्याच्या ऐतिहासिक प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी सुद्धा आपल्या कार्यालयाच्या नावाच्या पाट्या बदलल्या, ज्यात त्यांच्या आईच्या नावाचा उल्लेख आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेमप्लेटवर ‘देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस’, तर अजित पवारांच्या नेमप्लेटवर ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ असे लिहिले आहे. त्यांच्याबरोबरच महिला व बालकल्याण मंत्री आदिती यांनीही आपल्या नावाच्या पाटीत वरदा असा नामोल्लेख केला आहे. मंत्रालय आणि इतर शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आपल्या नेम प्लेटवर वडिलांच्या अगोदर आईचा उल्लेख केला.
पुरुष आपल्या नावानंतर आई-वडीलांचे नाव देत आहेत, मात्र विवाहित महिलांना लग्नानंतर पतीचे नाव लावावे लागते. त्यामुळे त्यांना इच्छा असूनही आईचे नाव लावता येत नसल्याने महिलावर्गातून खंत व्यक्त होत आहे.
तोडगा काढण्याची मागणी
महाराष्ट्र हे पुढारलेले राज्य आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल काम करीत आहेत. सावित्रीच्या लेकी आज उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ झाल्या आहेत. सध्या राज्यात वरिष्ठ अधिकारी आपल्या नावानंतर आई व वडिलांचे नाव लिहिलेली नेमप्लेट दालनाबाहेर लावतात, मात्र विवाहित महिला पदाधिकारी, त्याचबरोबर सरकारी अधिकारी असलेल्या भगिनींना पतीच्या नावापुढे आपले आईचे नाव लावता येत नाही. याबाबत सरकारने तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आईवडील दोघेही महत्त्वाचे असतात. आतापर्यंत आपल्या नावामागे वडिलांचे नाव लागत होते. सर्व शासकीय दस्तावेज आणि कागदपत्रांवर पितृसत्ताक पद्धत दिसत होती. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी, महिला विषयक धोरण राबवताना कागदपत्रावर आता आईचे नाव लावणेही बंधनकारक केले आहे. त्याची अंमलबजावणी काही ठिकाणी झाली आहे. मंत्री, सरकारी अधिकारी-पदाधिकाऱ्यांनी आपल्या नेमप्लेट बदलल्या आहेत. परंतु विवाहित महिलांना लग्नानंतर पतीचे नाव लावावे लागते. पुरुषांप्रमाणेच त्यांनाही आपल्या नावामागे आईचे नाव असावे, असे मनोमन वाटते. या संदर्भात सरकारने योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.
- नीलम आंधळे, संस्थापिका, दिशा महिला मंच
आता महत्त्वाच्या कागदपत्रांवर वडिलांबरोबरच आईचे नाव लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लग्नानंतर आपले नाव बदलायचे की नाही, हे त्या महिलेवर अवलंबून आहे. विवाहित महिलाही वडिलांकडील नाव ठेवू शकतात, तसा त्यांना घटनेने अधिकार दिला आहे. ही प्रचलित पद्धत आहे. त्यामुळे वडिलांचे नाव ठेवायचे की पतीचे हा सर्वस्वी निर्णय महिलांचा निर्णय आहे. माहेरकडील नाव ठेवले तर त्या महिलेला आपल्या आईचे नाव लावता येईल.
- आदिती तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य
सरकारी कागदपत्रांत, दाखले, प्रमाणपत्रात व्यक्तीच्या नावानंतर आईचे नाव लावण्याचा सरकारने काढलेला नियम स्तुत्य आहे. परंतु विवाहित महिलांनाही आईचे नाव लावता आले तर, ही बाब मनाला सुखावणारी ठरले. आपल्या नावापुढे आईचे नाव लागले तर कुठल्याही महिलेला अभिमानच वाटेल.
- ज्योती कवाडे, सहायक संचालक, नगररचना विभाग, पनवेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.