दिलीप कुमार यांच्या लहान भावाचे कोरोनामुळे निधन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

गेल्या 15 दिवसात दिलीप कुमार यांच्या कुटुंबाला बसलेला हा दुसरा धक्का आहे.

मुंबई - बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांच्या लहान भावाचे कोरोनामुळे निधन झाले. 15 दिवसांपूर्वी त्यांच्या दुसऱ्या एका लहान भावाचं कोरोनामुळे निधन झालं होतं. आता एहसान खान यांनी मुंबईतील लिलावती रुग्णालात अखेरचा श्वास घेतला. बुधवारी रात्री 11 च्या सुमारास त्यांचे निधन झाले. एहसान खान हे 90 वर्षांचे होते आणि त्यांना कोरोना झाल्यानं रुग्णालयात उपचार सुरू होते. याशिवाय हायपर टेन्शन आणि अल्झायमर या आजारांशी ते लढत होते. गेल्या 15 दिवसात दिलीप कुमार यांच्या कुटुंबाला बसलेला हा दुसरा धक्का आहे.

याआधी दिलीप कुमार यांचा सर्वात लहान भाऊ असलम खान यांचे 21 ऑगस्टला निधन झाले होते. त्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. दिलीप कुमार यांच्या दोन्ही लहान भावांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर दोघांनाही मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल केलं होतं. असलम आणि एहसान यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. दोघांनाही व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. 
 

एहसान खान आणि असलम खान यांची कोरोना टेस्ट केल्यानंतर 15 ऑगस्टला रिपोर्ट आले होते. त्यानंतर दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात हलवले होते. दोघांवरही तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु होते. दिलीप कुमार यांच्या कुटुंबाला दोघांच्या निधनाने धक्का बसला आहे. अभिनेते दिलीप कुमार 97 वर्षांचे आहेत. ते सोशल मीडियावर सक्रीय असून चाहत्यांना प्रकृतीची माहिती देत असतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dilip kumar s younger brother ehsan khan passes away