मुंबईत इतर शस्त्रक्रिया सुरु करण्यावरुन पालिका- डॉक्टरांमध्ये मतभिन्नता

मुंबईत इतर शस्त्रक्रिया सुरु करण्यावरुन पालिका- डॉक्टरांमध्ये मतभिन्नता

मुंबई: कोविड थंडावल्यानंतर इतर महत्वाच्या शस्त्रक्रिया सुरु करण्यावरुन पालिका रुग्णालयाच्या डॉक्टरामध्ये मतभिन्नता असल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे इतर शस्तक्रिया टाळण्यावर पालिकेचा भर आहे. दरम्यान, सर्वसामान्य शस्त्रक्रिया सुरू करण्याची मागणी केईएमच्या डॉक्टरांनी केली आहे, अशा प्रकारे शस्त्रक्रियेची गरज असलेल्यांना ताटकळत ठेवणे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रूग्णालय प्रशासनाने मात्र त्यांची मागणी मान्य न करता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तयार राहण्यास सांगितले आहे.

रूग्णालयात सध्या कोव्हिड 19 च्या रूग्णाची संख्या 50 वर आली असली तरी सामान्य शस्त्रक्रिया सुरू करण्यास रूग्णालय प्रशासन तयार नाही. फक्त अत्यावश्यक शस्त्रक्रियांना परवानगी दिली आहे आणि दावा केलाय की सरकारने त्यांना कोविड 19 च्या संभाव्य दुसऱ्या लाटेसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. या निर्णयामुळे डॉक्टर नाराज आहेत. 

मार्च महिन्यात कोरोनाच्या प्रार्दुभावास सुरुवात झाल्यानंतर केईएम रूग्णालय हे पहिल्या अशा रूग्णालयांच्या यादीत आहे ज्याला कोविड रूग्णालयात बदलण्यात आलं. सुरुवातीच्या काळात 500 रूग्ण इथे दाखल करण्यात आले होते. 

लॉकडाऊनची घोषणा होताच सरकारी रुग्णालयांनी आणि पालिका रूग्णालयांनी अत्यावश्यक नसलेले आणि इतर सगळे उपचार पुढे ढकलले. जेणेकरून त्यांची सगळी शक्ती कोविडचा सामना करण्यात वापरता येईल. लॉकडाऊनपूर्वी केईएम रूग्णालयात 300 शस्त्रक्रिया करण्यात यायच्या आता मात्र त्या प्रती दिवशी 80 पर्यंत कमी झाल्या आहेत. 

शस्त्रक्रियेची घाई नसली तरी अशाप्रकारे रूग्णांना तात्काळत ठेवणे चुकीचे असल्याचे एका वरिष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. आम्हाला फक्त अत्यावश्यक केसेसवर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आल्याने गेल्या सहा महिन्यात रूग्णालयात एकही हिप किंवा जॉइंट रिप्लेसमेंट आणि इंम्प्लांट करेक्षन शस्त्रक्रिया झाली नसल्याचे एका डॉक्टरने सांगितलं. 

महामारीच्या सुरुवातीला जेव्हा परिस्थिती गंभीर होती तेव्हा अशा प्रकारची नियमावली योग्य होती. मात्र आता परिस्थिती निवळली आहे रूग्णालयातील कोविड रूग्णांचा आकडा देखील कमी आहे, आता तरी नॉन इमर्जन्सी शस्त्रक्रिया सुरु करायला हव्यात. 

ओपन हार्ट शस्त्रक्रियेला महिन्याभराचा उशीरही धोक्याचा ठरू शकतो आणि इथे शस्त्रक्रिया सहा महिन्यांनी पुढे ढकलतोय. लहान मुलांच्या ह्रदय शस्त्रक्रिया देखील पार पडत नाहीत. अनेक रूग्ण त्यांच्या हिप किंवा गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होऊ शकत नसल्याने अंथरुणाला खिळले आहेत. केसेसची संख्या वाढतेय आणि यापुढे आणखी थांबवू शकत नसल्याचे एका डॉक्टरचं म्हणणं आहे. 

ईएनटी विभाग ज्याचं रुपांतर कोव्हिड वॉर्डमध्ये करण्यात आलं होतं. तो गेल्या आठवड्यात पुन्हा सामान्य करण्यात आला.  याआधी येथे दररोज 20 शस्त्रक्रिया पार पडायच्या ज्याची संख्या आता तीनवर आली आहे. 

सगळे पुन्हा सुरळीत कधी सुरू होईल याचा काही नेम नसल्याने रूग्णालये रूग्णांना तारखा देण्यासही तयार नाहीये. त्यामुळे रूग्ण आमच्याशी हुज्जत घालतात पण आम्ही बांधील असल्याची खंत एका डॉक्टरने व्यक्त केली. 

रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांचे म्हणणे आहे की, आम्ही राज्य सरकार आणि पालिकेच्या नियमावली पाळत आहोत. सध्या कोविड रूग्णांसाठी 105 बेड तयार असून गरज पडल्यास त्यांची संख्या 500 पर्यंत वाढवण्यात येतील असं ते म्हणाले.

रूग्णालयात सध्या कर्मचाऱ्यांची कमतरता असून पहिल्या सारख्या केसेस आम्ही घेऊ शकत नाही, आमचे अनेक रेसिडेंट डॉक्टर जम्बो सेंटरमध्ये रोटेशन वर काम करतात तर रूग्णालयात फक्त अर्ध्या कर्मचाऱ्यांवर आमचं सध्या काम सुरू आहे असं ही ते म्हणाले.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Disagreement municipal and hospital doctors starting other important surgeries after covid

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com