नद्यांमधील गाळ उपसण्याच्या फक्त घोषणाच; प्रशासनाकडून कागदी घोडे नाचवणे सुरू

नद्यांमधील गाळ उपसण्याच्या फक्त घोषणाच; प्रशासनाकडून कागदी घोडे नाचवणे सुरू

अलिबाग : मुसळधार पावसामुळे डोंगरमाथ्यावरून नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येत आहे. तो गाळ नद्यांच्या पात्रात साचला जात आहे. वर्षानुवर्ष हा गाळ काढलेला नसल्याने रायगड जिल्ह्यातील  कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा, अंबा या नद्यांच्या पात्रात बदल होत आहे. हा गाळ काढण्यासाठी अनेक योजनांची घोषणा झाली; मात्र अद्यापही येथील नद्यांचा प्रवाह गाळामुळे रोखला जात असून ही परिस्थिती कायम आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा धोका दरवर्षी जाणवत असतो. 

रायगड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 3 हजार 126 मिलीमिटर पावसाची नोंद होते. सह्याद्रीच्या पर्वत रांगांवरून हे पाणी प्रचंड वेगाने खाली येते. डोंगर उतारावरून खाली येताना या पाण्यासोबत दगडगोटे वाहून येतात. पावसाळ्यानंतर हे दगडगोटे नदीच्या पात्रात गाळाच्या स्वरूपात साचून राहतात. हा गाळ साचत गेल्याने नदीपात्र उथळ होत जाते. त्यामुळेच नदी किनाऱ्यावरील गावांना दरवर्षी पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागते. 
जिल्ह्यात पुराचा धोका असणारी 128 गावे आहेत. त्याचबरोबर रोहा, नागोठणे, महाड या शहरांना दर वर्षी पुराचा तडाखा बसत असतो. पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी 2009 मध्ये जिल्ह्यातील सावित्री आणि कुंडलिका नद्यांचा गाळ काढण्याबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठवण्यात आला. मदत व पुनर्वसन विभागाकडे सादर केलेल्या या प्रस्तावातील रोहा शहरालगत नदी किनाऱ्यावर संरक्षक भिंत उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र इतर ठिकाणच्या प्रस्तावांवर अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही.

जुलै 2005 अतिवृष्टीमध्ये आलेल्या महापुरात अनेक गावांचा संपर्क तुटलेला होता. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करून अनेक उपाययोजना आखल्या गेल्या; परंतु त्या सर्व कागदावरच राहिल्या आहेत.

संपन्न बंदरे इतिहासजमा
गाळ साचलेला असल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पुरेशी वाट नाही, यामुळे पुराचा धोका जास्त जाणवत आहे. या गाळामुळे एकेकाळची रोहा, नागोठणे, रेवदंडा, भालगाव, धरमतर ही संपन्न बंदरे इतिहासजमा झालेली आहेत. हा गाळ उपसणे आवश्यक असले तरी घोषणे पलीकडे काहीच होत नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. 

मदत व पुनर्वसन विभागाकडे सादर केलेला प्रस्ताव निधी
गाळाची बेटे काढण्यासाठी 

महाड।    सावित्री नदी।       7 कोटी 47 लाख रुपये
रोहा।       कुंडलिका नदी।    2 कोटी 87 लाख रुपये

नदीकिनारी संरक्षक भिंत उभारण्यासाठी
महाड      9 कोटी 38 लाख रुपये
रोहा        5 कोटी 82 लाख रुपये

सावित्री नदीपात्रात चार बेटे आहेत. या खासगी बेटांमधील दोन बेट मालकांनी ती काढण्यास सहमती दर्शवली आहे. गाळाची समस्या सुटावी यासाठी प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे. दोन बैठका घेऊन आढावाही घेतला आहे. पावसाळ्यानंतर हे काम करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. काही संस्थांनी हा गाळ काढून देण्याची तयारी दर्शवली आहे. पुढील वर्षी महाड शहराला पूरस्थितीला सामोरे जावे लागू नये, असा प्रयत्न केला जाईल. 
- निधी चौधरी,
जिल्हाधिकारी, रायगड

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com