डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांचा डि. लिट पदवीने सन्मान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये संपन्न झालेल्या पदवी दान समारंभात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते बंग दाम्पतीना गौरविण्यात आले.

मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना डी.लिट पदवीने सन्मानीत करण्यात आले. सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये संपन्न झालेल्या पदवी दान समारंभात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते बंग दाम्पतीना गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरिष महाजन, कुलगुरु डॉ.दिलीप म्हैसेकर उपस्थित होते.

विद्यापीठाकडून आरोग्य व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्‍तींना विद्यापीठातर्फे डि. लिट या मानद पदवीने सन्मानित करण्यात येते.सामाजिक कार्यकर्ते डॉ.अभय बंग व डॉ. राणी बंग यांनी गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम आदीवासी भागामध्ये तीन दशकांपेक्षा अधिक काळ आरोग्य आणि सामाजिक सेवा केली आहे. डॉ. अभय बंग हे ’सर्च’ या संस्थेमार्फत दुर्गम व आदीवासी ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देण्याचे कार्य करत आहेत. 

परदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊन त्याचा उपयोग त्यांनी देशातील लहान बालके, आदीवासी स्त्रिया यांच्या आरोग्यसेवेसाठी केला. समाजातील व्यसनांचे वाढते प्रमाण कमी  करण्यासाठी जनजागृती तसेच व्यसनमुक्‍ती उपक्रमांवर त्यांनी भर दिला आहे. आदिवासी भागात बालमृत्यूचे प्रमाण अधिक असून असे प्रश्‍न सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. बालमृत्यू कमी करण्यासाठी त्यांनी संशोधित केलेले ’नवजात बालसेवा’ हे मॉडेल जगभरातील अन्य देशात आजही प्रभावीपणे वापरले जात आहे. त्यांच्या 'सर्च' संस्थेचे कार्य व कार्यपध्दती जन्स हपकिन्स विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असून विद्यार्थ्यांंना ‘केस स्टडी’ म्हणून शिकवले जाते. वैद्यकीय नियतकालिक द लॅनसेटमध्ये त्यांचे अनेक लेख छापून आलेले आहेत. त्यांनी स्वत:च्या हृदयरोगावरील अनुभवकथन 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' पुस्तकातून केले आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे यापूर्वी सन 2007 मध्ये पद्मभुषण डॉ. एल. एच. हिरानंदानी, सन 2008 मध्ये डॉ.अनिल कोहली व सन 2015 मध्ये डॉ. सायरस पुनावाला यांना, सन 2016 मध्ये डॉ. प्रकाश आमटे यांना डि.लिट या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dlit to Dr Abhay Bang and Rani Bang