esakal | सरकारने शाळेची घंटा वाजवू नये; मुलांना संसर्ग होण्याची पालकांमध्ये भीती..
sakal

बोलून बातमी शोधा

school

जून महिन्यांपासून नवी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. यात 227 शाळकरी मुलांचाही समावेश असल्याचे आढळून आले आहे.

सरकारने शाळेची घंटा वाजवू नये; मुलांना संसर्ग होण्याची पालकांमध्ये भीती..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा, सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई : जून महिन्यांपासून नवी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. यात 227 शाळकरी मुलांचाही समावेश असल्याचे आढळून आले आहे. जुलै महिन्यापासून शाळा सुरू होत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालू नये, असा आग्रह पालकवर्गाकडून धरला जात आहे.

सध्या नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 6200 आहे. मोठ्या व्यक्तीबरोबरच लहान मुलांनाही याची लागण होत आहे. 29 मे ते 28 जून या एक महिन्याच्या कालावधीत नवी मुंबईतील रुग्णांची संख्या 4269 झाली असून, त्यात 227 शाळकरी मुलांना संसर्ग झाल्याचे पालिकेच्या कोव्हीड -19 च्या तपशीलवार अहवालाच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. 

हेही वाचा: परदेशी पर्यटकांना कारागृहात डांबण्यामागे उद्देश काय?  मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल..

हे प्रमाण एकूण रुग्णांच्या 5.31 टक्के आहे. त्यात 6 ते 9 वयोगटातील 57 (25.11टक्के), 10 ते 13 वयोगटातील 73 (32.15 टक्के),14 ते 15 वयोगटातील 43 (18.94टक्के) तर 16 ते 17 वयोगटातील 54 (23.78 टक्के) मुलांचा समावेश आहे. हीच परिस्थिती राज्यात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात आहे.  

तीन महिन्यांनंतर सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर सरकारी, खासगी शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार स्थानिक प्रशासनाकडून नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग जुलै महिन्यापासून सुरू करण्याच्या दृष्टीने चाचपणी व कार्यवाही केली जात आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीपोटी पालक आपल्या पाल्यांना शाळांमध्ये पाठवण्यास इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्याची सर्व भिस्त पालकांवरच अवलंबून असल्याचे सध्या तरी चित्र आहे.

शिक्षणमंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन:

रेड झोनमधील प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यास विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या आरोग्यास प्रचंड धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे 1 जुलैपासून प्रत्यक्ष शाळा सुरू करू नये, असे निवेदन शिक्षक सेनेचे कोकण विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना ई-मेलद्वारे दिले आहे. 

शाळा सुरू करण्याचे धाडस करू नये:

रेड झोनमधील शाळांसाठी स्वतंत्र नियमावली लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली असली, तरी त्याआधी त्यांनी राज्यातील बाधित मुलांची आकडेवारी जिल्ह्यानिहाय व तालुकानिहाय जाहीर करावी. त्यानंतरच जनमानसांचा कौल घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा. सद्यस्थितीत धोका पत्करून शाळा सुरू करण्याची आवश्यकता नाही. त्याबाबतीत सरकारने कोणतेही धाडस करू नये, असे मत शिक्षणतज्ज्ञ अर्जुन घोलप यांनी व्यक्त केले आहे.    

"कोरोनामुळे सर्व यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत. त्याला शिक्षणव्यवस्थाही अपवाद नाही. परंतु, विद्यार्थ्यांच्या जीविताचे रक्षण करण्यास सर्वोच्च प्राधान्य असायला हवे आणि त्यासाठी एक सत्र रद्द करावे लागले, तरी हयगय करता कामा नये", मुख्याध्यापक अरुण जोशी यांनी म्हंटलंय. 


हेही वाचा: शिवसेना भवन आता शिवसैनिकांसाठी काही दिवस बंद, कारण आहे.

29 मे ते 28 जून या कालावधीत विभागावर आढळलेल्या बाधित शाळकरी मुलांची आकडेवारी:

वय      शालेय वर्ग      संख्या    टक्केवारी
 6 ते 9      1 ते 4  57 25.11%
10 ते 13      5 ते 8       73 32.15%
 14 ते 15    9 ते 10  43 18.94%
16 ते 17   11 ते 12 54 23.78%
  एकूण संख्या 227  

विभागानुसार आकडेवारी तक्ता:

 विभाग  शाळकरी  मुलांची संख्या     
नेरूळ  46
कोपरखैरणे 44
तुर्भे  41
ऐरोली      32
घणसोली   25
बेलापूर   21
वाशी   11
दिघा    07
एकूण संख्या 227

do not open schools says navi mumbai residents parents