उल्हासनगरातील ‘महक’ग्रस्तांना घर देता का?

उल्हासनगर : मूक मोर्चात सहभागी झालेले ‘महक’मधील रहिवासी. (छायाचित्र : हृषिकेश चौधरी)
उल्हासनगर : मूक मोर्चात सहभागी झालेले ‘महक’मधील रहिवासी. (छायाचित्र : हृषिकेश चौधरी)

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये मागील आठवड्यात सोमवारी (ता. १२) महक ही पाच मजली इमारत झुकल्याने ३१ कुटुंबीयांना बाहेर काढून खाली करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी ती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळण्याची घटना  घडली होती. आज मंगळवारी (ता. २०) पालिकेची महासभा होती. ते लक्षात घेऊन, या इमारतीमधील बेघर रहिवाशांनी महिला-बच्चे कंपनीसह आज पालिकेवर मूक मोर्चा काढून ‘बेघरांना घर देता का घर’ची हाक दिली. दरम्यान, या बेघर रहिवाशांना साई पक्षाच्या १२ नगरसेवकांनी तीन महिन्यांचे मानधन जाहीर केले आहे. 

१४ ऑगस्टच्या सायंकाळी ‘महक’ व अन्य इमारतींच्या परिसरातील रहिवाशांची बैठक झाली. या बैठकीनंतर संजय लुल्ला, विकी इसराणी, मयूर खत्री, चिंटू खत्री, नीतेश ठाकूर, मांजेश गोरेजा, संजय आहुजा, पवन पंजवानी, अमित वाधवा, रोहित सैनानी, संजय तलरेजा या तरुणांनी १५ ऑगस्टच्या पहाटे लोकल पकडून मंत्रालय गाठले. ध्वजवंदनासाठी जाणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी कायदा करण्याची मागणी करण्यासाठी हे तरुण गेले होते. 

मात्र, त्यांना मंत्रालयाच्या मुख्य द्वारावरच पोलिसांनी अडवले आणि मरीन ड्राईव्ह येथील पोलिस ठाण्यात दुपारी १ वाजेपर्यंत बंद करून ठेवले. १५ ऑगस्ट रोजी बेघर झालेल्या या इमारतीतील रहिवाशांनी शेकडोंच्या संख्येने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोस्ट कार्ड पाठवून ‘घर देता का घर’ची मागणी केली आहे. 

दरम्यान, उल्हासनगर महापालिकेची सर्वसाधारण महासभा असल्याने ‘महक’च्या रहिवाशांनी महिला-बच्चे कंपनीला सोबत घेत हातावर काळ्या फिती, तोंडावर मास्क व हातात बॅनर घेऊन मूक मोर्चा काढला. साई पक्षाचे उपमहापौर जीवन इदनानी, सभागृहनेते शेरी लुंड, टोनी सीरवानी, कविता पंजाबी, ज्योती बठिजा, कंचन लुंड, ज्योती चैनानी, गजानन शेळके, अजित गुप्ता आदी १२ नगरसेवकांनी त्यांचे तीन महिन्यांचे मानधन ‘महक’मधील रहिवाशांसाठी जाहीर केले आहे.

रहिवाशांवर दारोदार भटकण्याची वेळ 
‘महक’ इमारत कोसळताना जमिनीला हादरा बसल्याने या इमारतीच्या बाजूच्या रतन, धरम व मंगलम या तिन्ही इमारती रिकामी करण्यात आल्या आहेत. आयुक्त सुधाकर देशमुख यांनी या इमारतींचे स्ट्रक्‍चरल ऑडिट झाल्याशिवाय रहिवाशांनी तेथे राहू नये, असा पावित्रा घेतल्याने आजूबाजूच्या पाच इमारतींमधील शेकडो कुटुंबीयांवर दारोदार भटकण्याची वेळ आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com