मोकाट कुत्र्याचा हौदोस; 10 विद्यार्थ्यांवर केला हल्ला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 January 2020

एकाच दिवसात 10 शाळकरी मुलांना भटक्‍या पिसाळलेल्या कुत्र्याने चावे घेऊन जखमी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

भिवंडी : भिवंडी शहर महानगरपालिका क्षेत्रात मोकाट व भटक्‍या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी एकाच दिवसात 10 शाळकरी मुलांना भटक्‍या पिसाळलेल्या कुत्र्याने चावे घेऊन जखमी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. शहरातील शांतीनगर परिसरातील अन्सारनगर, खंडूपाडा, पटेलनगर येथे ही घटना घडली आहे.

मोकाट पिसाळलेल्या या कुत्र्याने हैदोस घातल्यामुळे शाळकरी मुलांसह पालकवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे महापालिका व संबंधित शासकीय यंत्रणेने या पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी पालकवर्गाकडून करण्यात येत आहे. 

हया, अहमद, माहेनूर खान, अकरम इब्राहिम, अब्दुल, हसनैन, रब्बानी, हुजैफा, अय्यब अन्सारी, यश चन्ने आदी शाळकरी मुलांसह दहा मुलांना पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने चावा घेऊन त्यांना जखमी केले आहे. यापैकी हया नामक मुलीच्या चेहऱ्यावर व माहेनूरला गळ्यावर कुत्रा चावल्याने गंभीर जखमा झाल्या आहेत.

ही बातमी वाचा ः बांधकाम बंदी नंतर ठाणे पालिकेला जाग!

या सर्वांना प्रथम स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचार करण्यात आले होते; मात्र यातील हया व माहेनूर या दोन मुलांची प्रकृती खालावल्याने असल्याने त्यांना ठाणे शासकीय रुग्णालय व मुंबईला हलवण्यात आले आहे; तर अन्य मुलांवर स्थानिक रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. दहा चिमुरड्यांना कुत्रा चावल्याच्या या घटनेने पालकवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. भटक्‍या पिसाळलेल्या कुत्र्यांची महापालिकेने व संबंधित शासकीय यंत्रणेने दखल घेऊन प्रतिबंध करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. 

भटकी कुत्री पकडण्याची मोहीम सुरू आहे. नागरिकांनी भटकी कुत्रे फिरत असतील तर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे लेखी तक्रारी कराव्यात. योग्य कारवाई केली जाईल. 
- डॉ. प्रवीण आष्टीकर, आयुक्त, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The dog attacked 10 students In bhivandi