Dombivali News : 14 गावांच्या विकासासाठी 140 कोटींचा निधी; मनसे आमदारांनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

गावांचा पालिकेत समाविष्ट होण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याने गावांच्या विकासासाठी 140 कोटींचा निधी दिला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास समितीला दिले आहे.
Chief Minister Eknath Shinde news
Chief Minister Eknath Shinde newssakal
Updated on

डोंबिवली - नवी मुंबई महापालिकेतून वगळलेली 14 गावे पुन्हा महापालिकेत समाविष्ट करण्याविषयी अधिसूचना निघूनही या गावांचा अद्याप महापालिकेत समावेश झालेला नाही. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना जाहीर झाल्याने या तांत्रिक बाबीत गावांचा महापालिकेत प्रवेश प्रक्रिया रखडली आणि गावांचा विकास ही रखडला.

गावांचा पालिकेत समाविष्ट होण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याने गावांच्या विकासासाठी 140 कोटींचा निधी दिला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास समितीला दिले आहे. गावातील नागरिकांच्या मागण्यांचा सहानुभूती पूर्वक विचार केल्याने कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे मनसे आभार मानले आहेत.

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील 14 गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात यावी यासाठी 14 गाव सर्व पक्षीय विकास समिती गेली अनेक वर्षे लढा देत आहे. विकास समिती सोबतच मनसेचे कल्याण ग्रामीण आमदार राजू पाटील हे देखील गावांच्या विकासासाठी या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश व्हावा यासाठी पाठपुरावा करीत होते.

2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार पाटील यांनी याविषयी मुद्दा उपस्थित केल्यानंतर तत्कालीन नगरविकास मंत्री शिंदे यांनी गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याविषयी घोषणा केली होती. घोषणा झाली परंतू त्याविषयी पुढे काहीच हालचाली होत नव्हत्या. समिती सदस्य सातत्याने सर्व पक्षातील वरिष्ठांची भेट घेत होते, मात्र त्यांना आश्वासनां पलीकडे काही हाती लागत नव्हते.

राज्यात सत्तांतर होऊन शिंदे व फडणवीस यांचे सरकार आले, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि समितीच्या आशा पल्लवित झाल्या. त्यातच आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आश्वासनांची पूर्तता करा अशी मागणी केली होती. त्यानंतर लगेचच सप्टेंबर 2022 मध्ये गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची अधिसूचना निघाली.

त्यावर हरकती देखील मागविण्यात आल्या होत्या. याला आता दहा महिन्यांचा कालावधी उलटला असून त्यावर पुढे काहीच हालचाली होताना दिसत नाही. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पालिकेतील प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्या असून त्यात फेरफार करता येत नसल्याने या गावांची समावेश प्रक्रीया रखडल्याचे बोलले जात आहे.

गावांचा पालिकेत समावेश नाही, भंडार्ली येथील डंम्पिगची मुदत संपल्यानंतरही येथे ठाणे महापालिकेच्या वतीने कचरा टाकला जात आहे, गावांच्या विकासासाठी निधीची कमतरता, गावांत पसरणारी रोगराई, दुर्गंधी या सर्व समस्या घेऊन आमदार पाटील यांसह 14 गाव सर्व पक्षिय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, गुरुनाथ पाटील, सुखदेव पाटील, ज्ञानेश्वर येंदारकर, भरत भोईर, विजय पाटील यांच्या समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

यावेळी 14 गावे नवी मुंबई पालिकेत समाविष्ट करण्याकरिता सरकार ने अधिसूचना काढली आहे. परंतू हरकत व सुचनांनंतरची अंतिम अधिसूचना तांत्रिक बाबी मुळॆ अद्याप काढली नाही व त्यामुळे या गावांमधील विकास कामे ठप्प झाली आहेत. याविषयी मुख्यमंत्री शिंदे यांनी लवकरात लवकर अधिसूचना काढण्यात येईल असे सांगत संबंधित विभागास बाबींची पूर्तता करण्यास सांगितले.

भंडार्ली डंम्पिंग बंद करणे तसेच गावांच्या विकासासाठी विकास निधी विषयी तातडीने भंडार्ली येथील डंपींग येत्या 15 सप्टेंबरच्या आधी बंद करण्याचे आश्वासन दिले. विकास कामांसाठी नगर विकास विभागातून 70 कोटी व एमएमआरडीएच्या माध्यमातून 70 कोटी असे एकूण 140 कोटी निधी देण्याचे जाहीर केले.

14 गावांच्या प्रश्नाविषयी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून त्यांनी आमचा सहानुभूतीपूर्वक विचार करत आम्हाला आश्वासित केले असून त्यांचे आभार मानल्याचे यावेळी आमदार पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.