डोंबिवली : हिंदकेसरी सोनारपाड्याचा मोठा सोन्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 मिरवणूक काढत बैलगाडा मालकांनी त्याचे कौतुक केले.

डोंबिवली : हिंदकेसरी सोनारपाड्याचा मोठा सोन्या

डोंबिवली: बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी बैलगाडा शर्यती भरविल्या जात आहेत. सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथे पार पडलेल्या मानाच्या हिंदकेसरी बिनजोड स्पर्धेत डोंबिवलीतील सोनारपाड्याच्या मोठ्या सोन्याने बाजी मारत यंदाचा हिंदकेसरीचा मान पटकाविला आहे. बिनजोड शर्यतीचा तुफान वेगाचा बादशहा अशी सोन्याची राज्यात ओळख असून त्याने आपले नाव पुन्हा एकदा सार्थ ठरविले आहे. गेली 8 वर्षे सोन्या विविध स्पर्धा गाजवत असून हिंदकेसरी हा मान देखील त्याने पटकाविल्याने गावागावात त्याची यशस्वी मिरवणूक काढत बैलगाडा मालकांनी त्याचे कौतुक केले..

डोंबिवलीतील सोनारपाडा येथील केशव पाटील व जयेश पाटील या प्रसिद्ध गाडा मालकांचा मोठ्या सोन्या सध्या विविध मैदाने गाजवत आहे. प. पू. श्री सेवागिरी महाराज यांच्या संजीवन समाधीच्या अमृत महोत्सवानिमित्त सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथे राज्यातील एक नंबरची मानाची हिंदकेसरी बैलगाडा शर्यत नुकतीच पार पडली. बिनजोड बैलांच्या शर्यतीत सेमी फायनल मध्ये राज्यभरातील 10 बैलांच्या जोड्या सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत सोन्याने महाराष्ट्र चॅम्पियन किताबचा मानकरी ठरत हिंदकेसरीचा मान पटकाविला आहे. त्याला चांदीची गदा, सन्मान चिन्ह व 3 लाखाचे बक्षिस मिळाले असल्याचे जयेश यांनी सांगितले.

सोनारपाड्यातील जयेश हे 20 वर्षापासून बैलगाड्याचे मालक आहेत. मोठा सोन्या, छोटा सोन्या व सोन्या अशा तीन बैलांच्या जोड्या पाटलांकडे आहेत. 7 वर्षापूर्वी त्यांनी सातारा येथून मोठ्या सोन्याची साधारण सात लाखाला खरेदी केली होती. तुफान वेगाचा बादशहा म्हणून सोन्याची राज्यात पहिल्यापासून ओळख आहे. कु. रिया जयेश पाटील या नावाने सोन्या मैदानात उतरविला जातो. ज्या स्पर्धेत तो उतरला आहे, त्या प्रत्येक स्पर्धेत सोन्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. राज्यात त्याचे 10 हजार चाहते असून परराज्यात देखील चाहते असल्याची माहिती जयेश यांनी दिली.

सोन्याचा खुराक

उडदाची डाळ, गव्हाचा आटा, शेंगदाण्याची पेंड, मक्याचा भरडा, 8 लीटर दुध, 5 ते 6 अंडी, गाजर, मक्याची कणस, उसाचा वाडा, ज्वारीचे भाटूक, हिरवा मका असे खाद्य त्याला दिले जाते. बैलांना दूध व अंडी भरपूर प्रमाणात मिळावे म्हणून पाटील यांनी म्हशी व कोंबड्या देखील पाळल्या असल्याचे केशव सांगतात.

सोन्याच्या सेवेत यांची साथ

स्पर्धेच्या ठिकाणी सोन्या जातो तेथे श्याम कारभारी, मुकूंद म्हात्रे, परेश भंडारी, समीर भोईर यांची खंबीर साथ सोन्याला असते. तर धरम पाटील, अमित पाटील, संकेत गायकर, चेतन मढवी, भावेश शिंदे, रोशन पाटील, सुमित विटकर, विशाल पाटील, योगेश फौजदार, हेमंत म्हात्रे हे सोन्याच्या सेवेत असतात.

Web Title: Dombivali Big Gold Hindkesari Sonarpada

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai NewsSakalanimal
go to top