पोलीस असल्याची बतावणी करत लुटणारा सराईत चोरटा गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

thief Gulam Ali

पोलीस असल्याची खोटी बतावणी करत नागरिकांना फसविणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला खडकपाडा पोलिसांनी बुधवारी रात्री आंबिवली (मोहने) येथील इराणी वस्तीतून अटक केली.

Crime News : पोलीस असल्याची बतावणी करत लुटणारा सराईत चोरटा गजाआड

डोंबिवली - पोलीस असल्याची खोटी बतावणी करत नागरिकांना फसविणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला खडकपाडा पोलिसांनी बुधवारी रात्री आंबिवली (मोहने) येथील इराणी वस्तीतून अटक केली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे सह गुजरात, तामिळनाडू येथील पोलिस ठाण्यात 40 हून अधिक चोरी आणि फसवणूकीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. गुलाम अली सरताज अली जाफरी उर्फ नादर (वय 40) असे अटक आरोपीचे नाव आहे.

आंबिवली येथील इराणी वस्ती ही गुन्हेगारांची वस्ती म्हणून ओळखली जाते. या वस्तीतून अनेक सराईट चोरट्यांना पोलिसांनी यापूर्वी कोंबिंग ऑपरेशन करत अटक केली आहे. काही वेळेस चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक, लाठीहल्ले होऊन चोरटे पसार झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. याच वस्तीतील गुलाम अली हा येणार असल्याची माहिती खडकपाडा पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अनिल गायकवाड यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलिस निरिक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाड यांच्या पथकाने इराणी वस्तीत सापळा रचला.

गुलाम अली हा वस्तीत येताच त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला हटकले. दरम्यान गुलाम याने पळून जाण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत इराणी वस्तीतून त्याला बेड्या ठोकल्या. गेल्या दोन वर्षात चोरी आणि फसवणूक प्रकरणी त्याच्यावर महाराष्ट्रासह, गुजरात तामिळनाडू राज्यात 40 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. चोरी, लुटमार, ऐवज लुटून नेणे, पोलीस असल्याचे खोटे सांगून नागरिकांची फसवणूक करणे असे प्रकार गुलाम अली याने केले आहेत. खडकपाडा पोलीस एका प्रकरणात जाफरीच्या मागावर होते. अखेर तो पोलिसांच्या तावडीत सापडला. गुलाम अली याच्याकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.