पलावा पुलावर अनधिकृत रिक्षा थांबा; वाहतूक पोलिस करताहेत दुर्लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

illegal rickshaw stop on palava bridge

कल्याण शीळ रोडचे काम सुरू असल्याने या ठिकाणी वाहन कोंडीचा सामना वाहनचालक करत आहेत. त्याच पलावा पुलावर रिक्षा चालकांनी अनधिकृत रिक्षा थांबा सुरू केला आहे.

Dombivali News : पलावा पुलावर अनधिकृत रिक्षा थांबा; वाहतूक पोलिस करताहेत दुर्लक्ष

डोंबिवली - कल्याण शीळ रोडचे काम सुरू असल्याने या ठिकाणी वाहन कोंडीचा सामना वाहनचालक करत आहेत. त्याच पलावा पुलावर रिक्षा चालकांनी अनधिकृत रिक्षा थांबा सुरू केला आहे. पुलाच्या तोंडाशीच रिक्षा चालक रिक्षा उभी करून प्रवासी भाडे आकारत आहेत. भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांची सतत वर्दळ पुलावर सुरू असल्याने एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पलावा जंक्शन परिसरात वाहतूक पोलीस तैनात असतानाही पुलावर बिनधास्त रिक्षा उभ्या करणाऱ्या चालकांना का अडविले जात नाही? वाहतूक पोलीस याकडे जाणून बुजुन दुर्लक्ष करत आहेत का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कल्याण शीळ रोडवरील वाहन कोंडी सोडवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करण्यास मनाई आदेश वाहतूक पोलिसांनी जारी केले आहेत. मात्र दुसरीकडे अनधिकृत रिक्षा थांब्याना मात्र अभय देण्यात येत असल्याचे दिसून येते. कल्याण शीळ रोडवर ठिक ठिकाणी सिमेंट काँक्रीटीकरणचे काम सुरू आहे. तसेच देसाई खाडीवर नवीन पूल उभारणीचे काम सुरू आहे. यामुळे कल्याण शीळ रोडवर वाहन कोंडी होत असून पलावा जंक्शन हे कोंडीचे मुख्य ठिकाण बनत आहे.

ठाणे, नवी मुंबई वरून कल्याण दिशेला येणारी जाणारी वाहने, पलावा सिटी, निळजे गाव, कासारिओ परिसरात जाणारे नागरिक, वाहने पलावा जंक्शन येथून प्रवास करतात. पलावा येथे मॉल असल्याने फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची देखील या परिसरात रीघ असते.

जंक्शन परिसरात वाहन कोंडी होत असल्याने येथे वाहतूक पोलीस तैनात असतात. पोलिसांनी वाहन चालकांना सूचना केल्यावर कोंडीत अडकलेली वाहने भरधाव वेगाने कल्याण दिशेला जाण्यासाठी निघतात, त्यात पलावा सिटी मधून कल्याण दिशेला जाणारी वाहने पुलावर जाण्यासाठी पुलाच्या तोंडाशी वळण घेतात.

याच ठिकाणी कल्याण दिशेला जाणाऱ्या लेनवर पुलावर रिक्षाचालक आपल्या रिक्षा उभ्या करून प्रवासी भाडे आकारतात. पलावा चौकात दोन ते तीन रिक्षा थांबे आहेत. तरी सुद्धा हा वेगळा थांबा कशासाठी. प्रवासी देखील रिक्षा मिळावी म्हणून जीव धोक्यात घालून तेथून रिक्षा पकडत आहेत.

जंक्शन परिसरात वाहन कोंडी होत असल्याने या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात असतात. मात्र ते या रिक्षा चालकांना अडवत नाहीत. या रिक्षा थांब्यास कोणाचे अभय आहे? वाहतूक पोलीस जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करीत आहेत का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.