स्वातंत्र्यदिनी डोंबिवलीकर अंधारात! गोग्रासवाडी, नामदेवपथ परिसरातील वीजपुरवठा पंधरा तास खंडीत

स्वातंत्र्यदिनी डोंबिवलीकर अंधारात! गोग्रासवाडी, नामदेवपथ परिसरातील वीजपुरवठा पंधरा तास खंडीत


ठाणे - स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येपासून डोंबिवली पूर्वेतील काही परिसरात वीज पुरवठा खंडीत झाल्याने डोंबिवलीकरांनी पंधरा तास अंधारात काढले. गोग्रासवाडी, नामदेव पथ येथील वीजपुरवठा शुक्रवारी रात्री 8.30 ला खंडीत झाला तो दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी 12 च्या दरम्यान सुरु झाला. त्यानंतरही वीजेचा लपंडाव सुरुच असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वीजेच्या या खेळखंडोब्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहावरही पाणी फेरले गेल्याची प्रतिक्रीया नागरिकांनी व्यक्त केली. 

डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी परिसराला वीज पुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीत (एचटी लाईन) बिघाड झाल्याने गोग्रासवाडी, संत नामदेव पथ, गोपाळनगर, जिजाईनगर परिसराचा वीज पुरवठा खंडीत झाला. रात्री साधारण 8.30 च्या सुमारास हा बिघाड निर्माण झाला. महावितरणच्या वतीने सुरुवातीली नागरिकांना एक तासात विज पुरवठा सुरळीत सुरु होईल असे सांगण्यात आले. परंतू साकार रेसीडेन्सी येथे मोठा बिघाड झाल्याचे लक्षात येताच वीज पुरवठा सुरळीत सुरु होण्यास पहाटे 4 वाजण्याची शक्यता महावितरणच्या वतीने वर्तविण्यात आल्याने नागरिक हैराण झाले होते. वीज पुरवठा खंडीत झाल्याचा फटका या परिसरातील साधारण 500 हून अधिक कुटूंबांना बसला. पावसामुळे वातावरणात गारवा असला तरी घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्या तर डास त्रास देत असल्याने नाईलाजाने नागरिकांना घराची दारे खिडक्या बंद ठेवून कोंदट वातावरणात अख्खी रात्र काढावी लागली. घरात लहान मुले, ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांना याचा जास्त त्रास झाला. पावसाळ्यात वीज पुरवठा वारंवार खंडीत होण्याचे प्रकार या परिसरात घडत असतात. महावितरण ग्राहकांकडून वीज बिल सक्तीने वसूल करुन घेते, परंतू त्याबदल्यात त्यांना सुविधा देत नाही. पावसाळ्याच्या आधी वीज वाहिन्यांची देखभाल दुरुस्ती केली जाते, परंतू तरीही पावसाळ्यात असे बिघाड का होतात याचा विचार कधी केला जाणार असा संतप्त सवाल नागरिक ज्योती पगारे यांनी केला. शुक्रवारी रात्री गेलेली लाईट दुसऱ्यादिवशीही दुपारपर्यंत न आल्याने आमचा स्वातंत्र्यदिनाचा उत्साहावरही पाणी फेरले गेल्याची भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली. 

डोंबिवली पूर्व उपविभागास वीज पुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीत मोठा बिघाड झालेला असून सध्या दुसऱ्या वाहिनीवरुन या परिसराचा वीज पुरवठा तात्पुरता सुरु करण्यात आला आहे. बिघाड दुरुस्तीचे काम अद्याप सुरु असल्याची माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता व्यंकटेश्वर शेट्टी यांनी दिली.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com