
Mumbai : लोकल मध्ये दिला गोंडस बाळाला जन्म
डोंबिवली : टिटवाळा रेल्वे स्थानकात कसारा येथून आलेल्या लोकलमध्ये एका महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. पहाटे पावणे सहाच्या दरम्यान ही घटना घडली असून नवजात बाळ व त्याची आई दोघेही सुखरुप आहे. त्यांना उपचारासाठी टिटवाळा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रिया वाकचौरे (वय 33) असे महिलेचे नाव आहे.
प्रिया ही शुक्रवारी सकाळी आटगाव येथून मुंबईच्या दिशेने रुग्णालयात जाण्यासाठी निघाली होती. लोकलमध्येच तिला प्रसुती कळा सुरु झाल्या होत्या. लोकल डब्यातील महिलांनी तत्काळ रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती पोलिसांना दिली होती.
टिटवाळा रेल्वे स्थानकात स्टेशन मास्तरांनी यासंबंधी घोषणा करत कर्तव्यावर असलेले महिला जीआरपी व आरपीएफ यांना फलाट क्रमांक 3 वरील सीएसटी लोकलमधील प्रथम वर्गाचा डब्बा तपासण्यास सांगितले. पोलिस महिला थोरात, देसले, पाचपांडे यांनी लोकल ट्रेन थांबवत तपासणी केली असता प्रिया यांना प्रसुती कळा येत असल्याचे समजले.
प्रिया यांची प्रसुती डब्यातच झाल्यानंतर महिला पोलिसांनी इतर प्रवासी महिलांच्या मदतीने प्रिया व बाळाला लोकलमधून बाहेर काढले. रुग्णवाहिकेतून त्यांना त्वरीत टिटवाळा येथील सिद्धी विनायक रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी महिला व बाळाला तपासत त्यांना उपचारासाठी दाखल करुन घेतले आहे. बाळ व आई दोन्ही सुखरुप असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मुकेश ढगे यांनी दिली.