Mumbai : ठाकरे गटाचे साळवी यांच्या मदतीला शिंदे समर्थक आमदार धावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

Mumbai : ठाकरे गटाचे साळवी यांच्या मदतीला शिंदे समर्थक आमदार धावले

डोंबिवली : शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय साळवी यांना पोलीसांनी तडीपारीची नोटीस पाठविली आहे. त्यानंतर साळवी यांच्यासह 22 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी साळवी यांना आपली बाजू मांडण्याची संधी द्या अशी मागणी शिंदे समर्थक आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे. आमदार भोईर यांनी गुरुवारी कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेत ही मागणी केली. राज्यात शिंदे ठाकरे समर्थकांमध्ये वाद सुरु असतानाच ठाकरे समर्थकांसाठी कल्याणमध्ये शिंदे समर्थक धावून गेल्याने शिवसैनिक एकत्र आल्याची भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात होती.

खरी शिवसेना कोणाची यावरुन ठाकरे शिंदे गटात राजकारण सुरु आहे. राज्यात हे वातावरण असताना कल्याणमध्ये ही दोन्ही गटात वादाची ठिणगी सातत्याने पडत होती. काही दिवसांपूर्वीच ठाकरे समर्थक जिल्हाप्रमुख विजय साळवी यांना पोलीसांकडून तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. साळवी यांना पोलिसांकडून त्यांचे प्रतिउत्तरासाठी वेळ देण्यात आली. यावेळी साळवी यांनी ही कारवाई सूडबूद्धीने होत असल्याचा आरोप केला होता. साळवी यांनी शेकडो समर्थकांसह एसीपी कार्यालयात जाऊन त्यांचा जबाब नोंदवला आहे. यावेळी ठाकरे समर्थकांनी जमाव जमवित एकत्र आल्यामुळे साळवी यांच्यासह 22 जणांविरोधात गुन्हे दाखल केले. यामुळे ठाकरे व शिंदे गटात वाद शमण्याची चिन्हे नव्हती.

शिवसेना कोणाची यावरुन राज्यात शिंदे ठाकरे समर्थक आमने सामने आलेले असतानाच कल्याणमधील वारे आता वेगळ्या दिशेने वाहू लागले आहेत. ठाकरे समर्थक साळवी यांना शिंदे समर्थक आमदार विश्वनाथ भोईर यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. गुरुवारी आमदारांनी शिवसैनिकांसह पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेतली. यावेळी माजी नगरसवेक मोहन उगले, रवी पाटील, सुनील वायले, श्रेयस समेळ यांसह अनेक समर्थक उपस्थित होते. आमदार भोईर यावेळी म्हणाले, साळवी आणि आमचे पारिवाराचे संबंध आहे. आम्ही दोघांनी एकत्रित काम केले आहे. ही कारवाई सूडबुद्धी केली गेली नाही. त्यांच्या विरोधात राजकीय गुन्हे दाखल आहेत. ही रूटीन प्रोसेस आहे. मात्र साळवी यांच्या वर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये याची पोलिसांनी दक्षता घ्यावी अशी मागणी आम्ही पोलीसांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.

शिंदे समर्थक आमदार भोईर यांनी ठाकरे समर्थक जिल्हाप्रमुख साळवी यांच्या मदतीसाठी पोलीसांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे. शिवसैनिक सध्या ठाकरे व शिंदे गटात विभागला गेला असला तरी त्यांच्या मनात बाळासाहेबांची शिवसेना हा एकच विचार असून याच भावनेतून आज दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकत्र आल्याची चर्चा रंगली आहे.