esakal | 'सुट्टी मिळाल्यावर मुंबईबाहेर जाऊ नका'

बोलून बातमी शोधा

teachers

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शिक्षकांना प्रशासनाकडून आदेश

'सुट्टी मिळाल्यावर मुंबईबाहेर जाऊ नका'

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई: मे महिन्यांच्या सुट्टीत महानगर पालिकेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुंबई बाहेर जाऊ नये, असे निर्देश महानगर पालिका प्रशासनाने शिक्षण विभागाला दिले आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत. महानगर पालिकेच्या शिक्षकांवर गेल्या वर्षी कोविड कामाची जबाबदारी देण्यात आली होती. यात प्रामुख्याने अन्न वितरणावर देखरेख ठेवणे आणि नियंत्रण कक्षातील कामाची जबाबदारी समाविष्ट करण्यात आली होती. नंतर कोविडचा जोर ओसरल्यावर त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आले. त्यामुळे यंदा शिक्षकांना सुट्टी मिळाली तर ते काही काळ हवाबदल करण्यासाठी बाहेरगावी जाण्याची शक्यता आहे. पण कोविडच्या परिस्थितीत बाहेरगावी जाणे काहीसे धोकादायक असल्याने मुंबईबाहेर न जाण्याचे त्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा: शिक्षण विभागाविरोधात येणाऱ्या याचिकांचा होणार अभ्यास

नियमानुसार मे महिन्यात शाळांना सुट्टी असते. त्यामुळे सुट्टीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मुंबईबाहेर जाण्याची शक्यता असते. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून एम पश्‍चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त अजित नरवडे यांनी शिक्षण विभागाला पत्र पाठवून सुट्टीत शिक्षण व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मुंबई बाहेर न जाण्याच्या सुचना द्याव्यात, असे निर्देश दिले आहेत. कोविड काळात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याची गरज भासू शकते.अशा वेळी संबंधीत व्यक्ती कर्तव्यावर हजर राहाणे गरजेचे आहे.त्यासाठी ही खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.तसेच,आवश्‍यकता भासेल तेव्हा संबंधीत कर्मचारी कर्तव्यावर हजर न राहिल्यास सेवा नियमावली नुसार कारवाई करण्यात येईल असेही या पत्रात नमुद आहे.कोविडच्या पहिल्या लाटेत काही शिक्षक त्यांना दिलेल्या ड्युटीवर हजर न झाल्याबद्दल त्यांना सेवेतून बडतर्फही करण्यात आले होते.

(संपादन- विराज भागवत)