esakal | डहाणू शहरात कोरोनासह अस्वच्छतेमुळे रोगराईचे दुहेरी संकट;  थकीत बील रोखल्याने कामगारांची उपासमार
sakal

बोलून बातमी शोधा

डहाणू शहरात कोरोनासह अस्वच्छतेमुळे रोगराईचे दुहेरी संकट;  थकीत बील रोखल्याने कामगारांची उपासमार

गणेशोत्सच्या ऐन मुहूर्तावर डहाणूत घाणीचे साम्राज्य सुरु होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविड 19 विषाणूंमुळे कोरोनासारख्या महाभयंकर आजाराचा सामना करत असताना अस्वच्छतेमुळे देखील वेगवेगळे साथीचे आजारही बळावण्याची भीती वाढल्याने डहाणूकर नागरिक दुहेरी संकटात सापडले आहेत.

डहाणू शहरात कोरोनासह अस्वच्छतेमुळे रोगराईचे दुहेरी संकट;  थकीत बील रोखल्याने कामगारांची उपासमार

sakal_logo
By
चंद्रकांत खुताडे

डहाणू - डहाणू नगरपरिषदेने घनकचरा संकलन व्यवस्थापन वाहतूक व प्रक्रिया करणाऱ्या ठेकेदाराचे थकीत बिल रोखल्याने स्वच्छता कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामगार कर्मचाऱ्यांनी आजपासून ( दि.20) शहरातील घनकचरा, घाण, केरकचरा,मैल टँक व्यवस्था, आदी स्वच्छतेची कामे थांबविली आहेत.त्यामुळे उद्यापासून साजरा होणाऱ्या गणेशोत्सच्या ऐन मुहूर्तावर डहाणूत घाणीचे साम्राज्य सुरु होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविड 19 विषाणूंमुळे कोरोनासारख्या महाभयंकर आजाराचा सामना करत असताना अस्वच्छतेमुळे देखील वेगवेगळे साथीचे आजारही बळावण्याची भीती वाढल्याने डहाणूकर नागरिक दुहेरी संकटात सापडले आहेत.

ठाण्याचे आयुक्त ऑनफिल्ड! एका दिवसात 850 खड्डे बुजवले; बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनाही सुनावले

साधारणतः लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या डहाणू नगरपरिषद हद्दीतील स्वच्छता व घनकचरा संकलन वाहतूक व प्रक्रिया व्यवस्थापनसाठी श्री गणेश ट्रान्सपोर्ट सर्व्हिस यांजकडून सेवा पुरवली जाते. दररोज सुमारे 8 ते 10 टन घनकचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावली जाते. ' स्वच्छ व सुंदर डहाणू ' या बिरुदावलीनुसार नगरपरिषद प्रशासन कार्य करीत आहे.घनकचरा व्यवस्थापन प्रशासनाच्या अखत्यारीत सेवा देत असल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे. परंतु मागील दोन महिन्यांपासून कोरोनाच्या कठीण काळात कोरोना योध्दे म्हणून स्वच्छतेचे काम करणाऱ्या सफाई कामगार व ठेकेदाराचे बिल नगरपरिषदेने काढलेच नाही.त्यामुळे कामगारांना वेतन देणे ठेकेदाराला अशक्य झाले आहे. साहजिकच कोरोना काळात जीवावर उदार होऊन स्वच्छतेची सेवा बजावणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.नगरपरिषदेत सुमारे 200 कामगार स्वच्छतेचे काम करतात.त्यापैकी सुमारे 62 कामगार हे घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सेवा बजावतात. बहुसंख्य कामगार हे आदिवासी समाजाचे आहेत.

." मुख्याधिकारी यांनी स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाचे थकीत बिल रोखल्यामुळे कामगारांनी कामबंद केले आहे. शहरात कचऱ्याचे ढिगारे वाढून ऐन सणासुदीला कोरोनाबरोबरच इतर साथीचे आजार पसरण्याची भीती आहे. हे थकीत बिल अदा केल्यास कामगारांना वेतन मिळेल.याबाबत मुख्याधिकाऱ्यांना कळविले आहे.  पाणीपुरवठा, वीजपुरवठा, तलाव साफसफाई, मैल टँक व इतरही विभागांची बिले थकीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी डहाणूचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले असून शिस्तभंगाची कारवाई करण्याची लेखी सूचना ( दि 10 ऑगस्ट ) असतानाही ते नगरपरिषद प्रशासनात मनमानी कारभार करत आहेत." --
भरत राजपूत,
नगराध्यक्ष

." डहाणूतील नागरिकांना आरोग्याच्या दुहेरी संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी घनकचरा व्यवस्थापनाचे थकीत बिल त्वरित अदा केल्यास कामगारांना वेतन देता येईल. ते पुन्हा कामावर रूजू झाल्याने हे सर्वत्र स्वच्छता निर्माण होऊन हे संकट टाळता येणे शक्य होईल. नाहीतर शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण होईल."
-- बाळासाहेब काकडे,
ठेकेदार, श्री गणेश ट्रान्सपोर्ट सर्व्हिस

. " करारानुसार ठेकेदारांना 16 मुद्द्यांचा खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे. त्याची पूर्तता केल्यास बिल त्वरित देण्यात येईल. कामगारांच्या वेतनाचा 5 लाख 80 हजार रुपयांचा धनादेश मंजूर करण्यात आला आहे." --
अतुल पिंपळे,
मुख्याधिकारी

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top