अवजड वाहनांसाठीचा टोल दुप्पट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अवजड वाहनांसाठीच्या टोल दरात १५५६ रुपयांची वाढ करण्यात आली असून, हे वाढीव दर ७ सप्टेंबर पासून लागू करण्यात आले आहेत.

पनवेल: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अवजड वाहनांसाठीच्या टोल दरात १५५६ रुपयांची वाढ करण्यात आली असून, हे वाढीव दर ७ सप्टेंबर पासून लागू करण्यात आले आहेत.त्यामुळे वाहतूकदारांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात कात्री बसणार आहे.

या निर्णयाविरोधात शिवसेनेचे रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूकदारांनी सोमवारी (ता.९) सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत, वाढीव टोल कमी करण्याची मागणी केली. याबाबत संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या जातील. असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

मुंबई पुणे द्रुतगती मार्गामुळे ९४ किमी लांबीच्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे दोन महानगराचे अंतर कमी झाले आहे. बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर हा महामार्ग बांधण्यात आला. याठिकाणी पूर्वी आयआरबीकडून टोल वसूल केला जात होता. तसेच महामार्गाच्या देखभालीचे कामही करण्यात येत होते. परंतु या कंपनीची मुदत संपल्यानंतर काही दिवसापूर्वी सहकार ग्लोबल या या एजन्सीला त्या स्वरूपात टोल वसुलीचे काम देण्यात आले आहे. तर रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनी महामार्गाची देखभाल करीत आहे. सहकार ग्लोबलने मोठ्या वाहनांसाठी टोलचा रकमेमध्ये वाढ केली आहे. पूर्वी एका बाजूने ५३० रुपयांचा टोल द्यावा लागत असे, आता ही रक्कम १३०८ रुपयांवर गेली होती. त्यामुळे जाण्यायेण्यासाठी २६१६ रूपये मोजावे लागणार आहेत. अशाप्रकारे वाहतूकदारांच्या खिशातून १५५६ रूपये वाहतूकदारांकडून वाढीव घेतले जात आहे. या टोलवाढीमुळे वाहतूकदार हवालदिल झाले आहेत. 

वाहतूकदारांनी शिवसेना पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता.९) सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली. ही टोल वाढ अन्यायकारक असून ती मागे घ्यावी, असे साकडे शेवाळे यांच्या शिष्टमंडळाने घातले. मंगळवारी(ता.१०) रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी तसेच सहकार ग्लोबलच्या व्यवस्थापनाची बैठक बोलावून याबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.
 

अवजड वाहतूकदारांची अडचण
बोर घाटात जुन्या महामार्गावरून अवजड वाहतूक बंद असल्याने वाहनांना द्रुतगती महामार्गाच्या वापर करावा लागतो. द्रुतगती महामार्गाचा अवजड वाहने वापर करत नाहीत, तरीसुद्धा त्यांना संपूर्ण टोल भरावा लागतो. त्यात आणखी ही वाढ करण्यात आली असल्याने वाहतूकदारांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

शासनाच्या नियमानुसार नवीन दर
राज्य शासनाचे टोल दरांसंदर्भात अधिसूचना निघाली आहे.त्याप्रमाने  २०१९-२० या वर्षांकरिता टोल दर प्रसिद्ध केले आहे. राष्ट्रीय महामार्ग४ मुंबई-पुणे महामार्ग आणि एक्‍सप्रेस वे चे दर वेगळे आहे. त्यामुळे जुन्या हायवेची पावती फाडून नंतर  खानापूर ते खुसगावपर्यंत राष्ट्रीय महामार्ग ४ चा वाहनचालक वापर करत असल्याने नवीन कंपनीने शासनाच्या दरांप्रमाणेच हे दर लावल्याचे एमएसआसाटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Double the toll for heavy vehicles ON EXPRESSWAY