स्वप्नवत सफरच बेतली हर्षदच्या जीवावर 

harshad.jpg
harshad.jpg

बदलापूर : "जब हम पैदा हुए, जग हॅंसे हम रोये। ऐसी करनी कर चलो, हम हॅंसे जग रोये' संत कबीराच्या दोह्यांप्रमाणे जगलेल्या बदलापूर येथील उत्तम गिर्यारोहक आणि युवा उद्योजक हर्षद दत्तात्रय आपटे (वय 33) यांचा शुक्रवारी हिमालयातील पर्वतरांगांमध्ये अतिशय खडतर अशा मानल्या जाणाऱ्या हर की दून ते चितकुल या बोरासू पास प्रवासात मृत्यू झाला.9 जूनला सुरू केलेल्या गिर्यारोहण प्रवासात हर्षद यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

कौटुंबिक, औद्योगिक आणि सामाजिक जबाबदारी समर्थपणे खांद्यावर घेणारा हर्षदच्या अचानक निघून जाण्याने त्याचे कुटुंबीय हादरले असून त्याचे मित्र, नातेवाइकही सुन्न झाले आहेत. हर्षदच्या पार्थिवाचे शवविच्छेदन झाल्यानंतर आज नातेवाइकांच्या ताब्यात ते मिळाले. उद्या (ता. 18) सकाळी पार्थिव बदलापूरमध्ये येईल आणि त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

गिर्यारोहणाच्या प्रवासात हिमालयाच्या पर्वतरांगातील खडतर मार्गाची सफर करणे हे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते; मात्र हीच स्वप्नवत सफर बदलापूरच्या हर्षदच्या जीवावर बेतली. बदलापूर पूर्वेतील कुळगाव सोसायटीत राहणारा हर्षद 12 सहकाऱ्यांसोबत हिमालयातील खडतर अशा उत्तराखंडातील हर की दून ते हिमाचल प्रदेशातील चिटकुल या 90 किलोमीटरच्या बोरासू पास प्रवासावर निघाला होता. 15 जूनला ते सर्व परतणार होते; मात्र 12 आणि 13 जूनला झालेल्या पावसामुळे तेथील परिस्थिती बिघडली. या परिस्थितीत समुद्रसपाटीपासून 3 हजार 800 किलोमीटर उंचीवरील रानीकंदा ठिकाणी गिर्यारोहक अडकले. त्यात हर्षद यांना श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने ते अत्यावस्थ झाले. त्यांच्या मदतीसाठी मदतनीसांनी मोठा टप्पा गाठला; मात्र मदत मिळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक इंडो तिबेटीयन सीमा दलाचे पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या गटाने अन्य 11 गिर्यारोहकांची सुटका केली. 

अतिशय उत्तम गिर्यारोहक 
वडील दत्तात्रय यांच्या आजारपणामुळे आपटे केमिकल्सची संपूर्ण धुरा हर्षद यांनी आपल्या खांद्यावर यशस्वीपणे घेतली होती. कारखान्यातील अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबरोबर हर्षद अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने वागत असत. हर्षदने जी जबाबदारी घेतली ती झोकून देऊन पूर्ण करीत असत. बीकॉमपर्यंत शिक्षण घेतलेल्या हर्षदने कारखान्याचे उत्पादन अधिक दर्जेदार आणि चांगले वाढवण्यासाठी अलीकडेच जपानचा दौराही केला होता. खूप कमी बोलणारा, अतिशय चांगला शेजारी होता, असे त्यांचे शेजारी राहणारे उदय कोतवाल यांनी सांगितले. अतिशय उत्तम गिर्यारोहक म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जात, असेही ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com