esakal | Lockdown Spl. : हे नको-ते नको, मग डान्स करा अन् फिट राहा!
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

लॉकडाऊन काळात कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करता करता तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहायचे आहे तर नृत्याचा उत्तम पर्याय असून तुम्ही तो आजमावून पाहा, असे नृत्यविशारद सांगताहेत

Lockdown Spl. : हे नको-ते नको, मग डान्स करा अन् फिट राहा!

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

ठाणे : लॉकडाऊनमुळे महिना झाला घरात आहात... पाय मोकळे करायला चान्स नाही. त्यात `वर्क फ्रॉम होम`चा ताण... एका जागी बसून बसून शरीर आणि मनही सुस्तावले आहे. खाणे, पिणे, झोपणे अन् नेमून दिलेली कामे करणे असंच सध्या सुरू आहे. मात्र त्याचा कंटाळा आल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. लॉकडाऊन काळात कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करता करता तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहायचे आहे तर नृत्याचा उत्तम पर्याय असून तुम्ही तो आजमावून पाहा, असे नृत्यविशारद सांगताहेत. समाजमाध्यमावर त्याच्या पोस्ट व्हायरल होताहेत. नृत्याचे ऑनलाईन धडे, नृत्याचे व्हिडीओ, नृत्याचे प्राथमिक ज्ञान आदी प्रकार समाजमाध्यमावर दिसू लागले आहेत. ते शिकण्याकडे अनेकांचा कल आहे.

महिनाभर घरात राहावे लागल्याने अनेकांची चलबिचल सुरू झाली आहे. टीव्ही-मोबाईलही कंटाळवाणे वाटू लागले आहेत. वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊनही झाले. शारीरिक हालचाल फारशी होत नसल्याने जेवण कमी जाणे, पचनक्रिया सुरळीत न होणे, मानसिक तणाव, उदासिनता, नैराश्य आदी गोष्टींनी डोके वर काढले आहे. आता फिट राहायलाच हवे, असे वाटू लागले आहे. अशांना, घरात राहून नृत्य शिका... नृत्याला ना वयाचे बंधन असते ना वेळेचे. 24 तासातील केवळ एक तास नृत्याला द्या आणि फिट राहा, असा सल्ला नृत्यविशारद देत आहेत. 

लॉकडाऊन कालावधीत नृत्याचेही ऑनलाईन क्लास ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई आदी ठिकाणी सुरू आहेत. खास कपल्ससाठी सोलो साल्सा डान्सचे विशेष वर्गही सुरू करण्यात आले आहेत. लॉकडाऊन काळातील आर्थिक स्थितीचा विचार करता फीमध्ये 50 टक्के डिस्काऊंटही मिळत आहे. अनेक नृत्यविशारद आपल्या सोशल अकाऊंटवर नृत्याच्या प्राथमिक स्टेप्स व विविध गाण्यांवरील नृत्याचे व्हिडीओ सतत अपलोड करत असून त्याद्वारे मोफत प्रशिक्षण देत आहेत. व्हिडीओ पाहा, आनंद घ्या आणि तुम्हीही शिका, असे आवाहनही केले जात आहे. 

नृत्याचे फायदे अनेक
शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि व्यक्तिगत अशा विविध स्तरांवर नृत्याचे फायदे दिसून येतात. नृत्य एक शारीरिक व्यायाम आहे. नृत्यामुळे शरीराची लवचिकता वाढते. स्नायू बळकट होतात. नृत्य एक उत्तम कार्डिओ (हृदयासाठी फायदेशीर) व्यायाम प्रकार आहे. नृत्यांमुळे रक्तदाब व मधुमेहसुद्धा नियंत्रणात राहू शकतो, असे नृत्यतज्ज्ञ सांगतात. संगीताच्या ठेक्यावर नृत्य करताना व्यायामाचा ताणही येत नाही. मनावरील तणाव दूर होण्यास मदत नृत्य करते. मन प्रसन्न राहते. नकारात्मक विचार कमी होतात.

ठाण्यात आमचे नृत्याचे क्लास आहेत. लॉकडाऊनमुळे मार्चपासूनच आम्ही ऑनलाईन क्लास घेणे सुरू केले. साल्सा आणि बताचा यांसारखे नृत्य प्रकार आम्ही शिकवतो. त्यामुळे व्यायामही होतो. मानसिक स्थिती उत्तम राहते. शरीरीतील अत्यावश्यक कॅलरीज निघून जातात. फिट राहण्यास मदत होते. 19 एप्रिलपासून आमची नवी बॅच सुरू होत आहे. 
- ऐश्वर्या क्रिष्णन, नृत्यविशारद

लॉकडाऊनमध्ये तुम्हाला आवडत्या गोष्टी शिका. मग नृत्य असो, संगीत असो की क्ले आर्ट. यू-ट्युब व गुगलवरून माहिती घ्या. तुमची कला विकसित करा. त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. नृत्याविषयी तर आम्ही सतत ऑनलाईन काही ना काही व्हिडीओ किंवा स्टेप्स सोशल मीडियावर अपलोड करीत असतोच. त्याचा फायदा घ्या. 
- ऐश्वर्या मेजारी, नृत्यविशारद

loading image