ई-चलन जाहले उदंड, वसुली थंडच!

ई-चलन जाहले उदंड, वसुली थंडच!

ठाणे : 'एक राज्य एक चलन' या डिजिटल संकल्पनेच्या आधारे सरकारने वाहतूक पोलिसांच्या कामकाजात पारदर्शकता आणली असली, तरी ठाणे शहरात यामुळे 'ई चलन' उदंड झाले असून वसुलीचा वेग मात्र थंड दिसून येत आहे.

फेब्रुवारी 2019 मध्ये ई-चलन प्रणाली लागू झाली. तेव्हापासून आजपावेतो 6 लाख 17 हजार 937 वाहनांवर याअंतर्गत कारवाई करून एकूण 20 कोटी 55 लाख 14 हजार 50 रुपयांचा दंड आकारण्यात आला. यापैकी केवळ 7 कोटी 68 लाख 17 हजार 350 रुपये दंड वसूल झाला असून तब्बल 12 कोटीहून अधिक दंडाची वसुली होणे शिल्लक आहे.

तेव्हा, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना पूर्वीच्या तुलनेत रस्त्यावरील वाद या ई-चलनमुळे टळले असले, तरी यामुळे पोलिसांच्या महसूल वसुलीला मात्र चालकांनी चांगलाच ठेंगा दाखवल्याचे दिसून येत आहे. थकबाकीची ही कोटींची उड्डाणे अशीच वाढत असल्याने थकीत दंडवसुलीचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. 

वाहतुकीबाबत चालकांना कितीही शिस्तीचे धडे दिले, तरी नियम पायदळी तुडवणाऱ्या चालकांची संख्या कमी नाही. त्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर पूर्वी पावती पुस्तकाद्वारे थेट कारवाई करून दंडवसुली केली जात असे अथवा न्यायालयीन प्रक्रियेअंतर्गत दंडाची वसुली केली जात असे.

यात पारदर्शकता यावी यासाठी सरकारने 14 फेब्रुवारी 2019 ला "एक राज्य, एक चलन' नुसार ई-चलन प्रणाली संपूर्ण राज्यात राबवण्याचा निर्णय घेतला. यामुळे पोलिसांच्या हातात पावती पुस्तकाऐवजी मशीन आल्याने वाहनचालकांशी रस्त्यावर उद्‌भवणारी वादावादी टळली आहे. वाहतूक विभागाच्या संपूर्ण कारभारावर एक प्रकारे "ई-अंकुश' आला आहे. 

ही प्रणाली लागू झाल्यापासून 25 डिसेंबरपर्यंत...  

  • 6 लाख 17 हजार 937 वाहनचालकांना ई-चलन बजावले 
  • 20 कोटी 55 लाख 14 हजार 50 रुपये दंड आकारला 
  • 2 लाख 88 हजार 591 वाहनचालकांकडून 7 कोटी 68 लाख 17 हजार 350 रुपये दंड वसूल 
  • 3 लाख 27 हजार 88 ई-चलन कारवाईतील 12 कोटी 26 लाख 87 हजार 300 रुपये दंडाची वसुली शिल्लक 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपघातांचे प्रमाण 10 टक्के कमी करण्यात यश येत असले, तरी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. ई-चलन प्रणालीनुसार कारवाईमुळे वादाचे प्रसंग टळले आहेत. एखाद्या चालकाने नियम मोडल्यास आम्ही फोटो काढून चालकाला सोडून देतो. नंतर चालकाने ते चलन भरणे आवश्‍यक आहे. दंड वसूल करणे आमचे काम नाही. दंड भरण्यास टाळाटाळ करणारे चालक कोठेही सापडला तरी त्याच्याकडून दंडाची वसुली केली जाते. शिवाय परवाने निलंबित करण्याची तरतूद आहे. 
- अमित काळे, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा 

काय आहे ई-चलन? 
'एक राज्य, एक चलन' या संकल्पनेच्या आधारावर ई-चलनद्वारे सरकारकडूनच डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन दिले जात आहे. ठाणे शहर वाहतूक विभागाने ई-चलन सुरू केले असून यासाठी 300 ई-चलन मशीनसाठी 54 अधिकारी आणि 300 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आणखी 200 मशीन येणार आहेत. ई-चलनमुळे एटीएम कार्डद्वारे वाहनचालक दंड भरू शकतात. तसेच ई-चलन काढल्यानंतर चालकाला तत्काळ मेसेजही जाईल. सारथी आणि वाहन या सॉफ्टवेअरशी देखील लिंक असणार आहे. शिवाय वाहनाच्या विमा कंपन्याशी लिंकअप करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय ठाणे महापालिका शहरात 1600 कॅमेरे बसवणार असल्याने ई-चलनमुळे वाहतूक कर्मचाऱ्याचे ठिकाण कळून त्याच्यावरदेखील लक्ष ठेवणे शक्‍य होणार असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com