Mumbai : शाळा सुरू करण्यावर शिक्षण विभाग ठाम

नव्या मार्गदर्शक सूचना जारी; दोन सत्रांत वर्ग भरविण्याचे आदेश
 schools
schoolssakal

मुंबई : कोरोना विषाणूच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या प्रकारामुळे राज्यात मात्र पहिली ते चौथी आणि सातवीपर्यंतच्या शाळा एक डिसेंबरपासून सुरू करण्याबाबतच्या आपल्या भूमिकेवर शिक्षण विभाग ठाम आहे.

शाळा सुरू करण्यासाठी विभागाकडून नवीन मार्गदर्शक सूचना आणि त्यासाठीचा शासन आदेश आज जारी करण्यात आला. त्यात राज्यातील प्रत्येक शाळा दरदिवशी दोन सत्रांत आणि किमान तीन ते चार तासांपेक्षा कमी कालावधीसाठी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाशिक महापालिकेने मात्र दहा डिसेंबरपर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गेल्या आठवड्यात पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी निर्णय घेण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर काल सार्वजनिक आरोग्य विभागाने शाळांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्ररीत्या मार्गदर्शक सूचना आणि त्याचा ‘जीआर’ जारी केला. आज शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका पार पडल्या. राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागांतील कोरोनाची स्थिती व शाळा सुरू करण्याच्या तयारीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार पहिली ते चौथी आणि सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाची तयारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

ऑनलाइन-ऑफलाइनचे पर्याय

प्रत्येक बाकावर एकच विद्यार्थी अशी व्यवस्था करून केवळ शाळांमध्ये ५० टक्केच उपस्थिती ठेवण्याचे आदेश मार्गदर्शक सूचनांमध्ये आहेत. त्यामुळे शाळांमध्ये उपस्थित राहण्यासाठी पालकांनी संमती न दिल्यास मुलांना ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षणाचे पर्याय उपलब्ध करून दिले जातील. शाळांमध्ये कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी मैदानी खेळांसोबत इतर कार्यक्रमांना बंदी असणार आहे. शिक्षण विभागाने ऑक्टोबरमध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये थोडी भर टाकून त्या नव्याने जारी केल्या असल्याचे शिक्षण‍ विभागातील वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनी सांगितले.

 schools
अफगाणिस्तान : तालिबान शासनाला १०० दिवस पूर्ण

ही खबरदारी घेणे गरजेचे

  • सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण हवे

  • पहिल्या एक ते दोन आठवड्यांमध्ये थेट शिक्षणावर भर न देता विद्यार्थ्यांना शाळेची सवय होऊ द्यावी. त्यासाठी आनंददायी शिक्षणावर भर द्यावा. गणवेश ऐच्छिक करावा.

  • शाळा, वर्गखोल्या आणि परिसर दररोज नियमित स्वच्छ व निर्जंतुक करावा. सॅनिटायझरची व्यवस्था करावी.

  • शाळा दोन सत्रांत भरवाव्यात.

  • दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर हवे

  • एका वर्गात जास्तीत-जास्त १५ ते २० विद्यार्थी असावेत

  • विद्यार्थ्यांस कोरोना झाल्याचे आढळल्यास तत्काळ शाळा बंद करावी

  • पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके, कोणतेही खेळ घेऊ नयेत.

  • प्रत्यक्ष वर्गाचा कालावधी तीन ते चार तासांपेक्षा अधिक असू नये

  • सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात

  • विद्यार्थ्यांची दररोज तापमान तपासणी करावी

  • संसर्ग टाळण्यासाठी पालकांनी शक्यतो विद्यार्थ्यांना वैयक्तिक वाहनाने शाळेत सोडावे. १०० टक्के लसीकरण झालेले वाहनचालक आणि मदतनिसांचीच सेवा घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com