एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, जयंत पाटलांची घोषणा

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, जयंत पाटलांची घोषणा

मुंबई : गेल्या महिनाभरापासून राष्ट्रवादीतील प्रवेशाची चर्चा सुरु असताना अखेर भाजपतील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी आज पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांसह प्रदेश कार्यालयात हा राजीनामा देण्यात आला. एकनाथ खडसे भाजपला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. जयंत पाटील यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे.

शुक्रवारी दुपारी २ वाजता खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.

एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपच्या सदस्याचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांचं आम्ही पक्षात स्वागत करत आहोत. शुक्रवारी दुपारी 2 वाजता त्यांचा पक्षात प्रवेश होईल, अशी घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली. एकनाथ खडसे यांचा शुक्रवारी प्रवेश होत आहे. त्यानंतर त्यांना काय जबाबदारी दिली जाणार हे नंतर ठरणार आहे, असं ही पाटील यांनी सांगितले.  यावेळी एकनाथ खडसे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय झाला असंही ते म्हणाले.

एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी पक्षामध्ये घेण्यात कोणतीही अडचण नाही, असंही ते म्हणालेत.  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येताना त्यांनी कोणतीही अट ठेवली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्त्वात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली, असंही पाटील सांगायला विसरले नाहीत. 

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यापासून खडसे पक्ष नेतृत्वावर नाराज होते. विधानसभेसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर खडसेंची नाराजी वाढली. नंतर राज्यसभा आणि विधानपरिषदेबाबत आश्‍वासन देऊनही त्याची पूर्तता न झाल्याने यामागे केवळ फडणवीस असल्याची तोफ डागत खडसेंनी राज्यातील भाजप नेतृत्वाला आव्हान दिले. 

गेल्या महिन्यापासून त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. शरद पवार यांनी खडसेंच्या प्रवेशाबाबत स्थानिक नेत्यांशी चर्चा करत चाचपणी केली, त्यानंतर खडसेंच्या प्रवेशाला हिरवा कंदील देण्यात आला. खडसेंना पक्षात घेतल्यानंतर नेमकी कोणती जबाबदारी द्यावी, यावर गेल्या १५ दिवसांपासून खल झाला. ते सूत्र ठरल्यानंतर अखेर त्यांचा प्रवेश निश्‍चित झाला आहे. 

याचदरम्यान खडसेंनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आले. मात्र, स्वत: खडसे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी त्याचे खंडन केले. अखेरीस आज सकाळी खडसेंनी जयंत पाटील यांच्या नरेंद्र मोदींवरील टीकेला रिट्वीट केल्यानंतर त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश पक्का मानला गेला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी रिट्वीट मागे घेतले, पण पक्ष सदस्यत्वाचा राजीनामाही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडे पाठवून दिला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com