उद्यापासून प्रचाराचा धुरळा उडणार!

दिपक घरत
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस 

पनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी 21 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर 13 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून 6 जणांचे अर्ज अवैध ठरले आहेत. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने, काही उमेदवार अर्ज मागे घेण्याची शक्‍यता आहे. 

पनवेल विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर आणि महाआघाडीचे उमेदवार हरेश केणी यांच्यात थेट लढत होणार असल्याचे, जवळपास निश्‍चित झाले आहे. राज्यात युतीत लढत असलेल्या सेना-भाजपच्या युतीमुळे अनेक मतदारसंघात मित्रपक्षाने दिलेल्या उमेदवाराविरोधात उघड उघड बंडखोरी दिसून आली आहे. पनवेलमध्येही असाच प्रकार घडला असून उरण विधानसभा मतदारसंघात भाजप जिल्हा चिटणीस महेश बालदी यांनी केलेल्या बंडखोरीचे निमित्त पुढे करत शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनीदेखील अपक्ष अर्ज दाखल करत आमदार प्रशांत ठाकूर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी उरण मतदारसंघात महेश बालदी यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनात उपस्थित राहून सेनेचा डाव सेनेवरच उलटवण्यात आमदार प्रशांत ठाकूर यांना यश आले आहे. 
.......... 
मनसे कार्यकर्ते संभ्रमात 
मागील दोन्ही विधानसभा लढलेल्या मनसेकडून पनवेलमध्ये उमेदवार देण्यात आलेला नाही. पनवेलमध्ये आतापर्यंत मनसेला अपेक्षित प्रभाव पाडता आला नसला, तरी राज ठाकरे यांना मानणारी युवा कार्यकर्त्यांची चांगली फळी पनवेल मनसेकडे आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरे कोणती भूमिका घेतात याबद्दल कार्यकर्ते अद्याप तरी संभ्रमात आहेत. तरी, शेकाप आघाडीच्या उमेदवारांना मनसेचा पाठिंबा जाहीर होण्याची शक्‍यता मनसे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. 
....... 
भारिपमध्ये नाराजी 
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला पनवेल, उरण मतदारसंघातून 2 आकडी संख्या गाठणे शक्‍य झाले होते. वंचितच्या उमेदवाराला मिळालेल्या मतदानामुळे तालुक्‍यातील भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते पनवेल विधानसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते; मात्र वंचितच्या जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना अंधारात ठेवून पनवेलकरिता दिलेल्या उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाल्याने वंचितच्या नेत्यांबाबत काययकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election campaign take off from tommarrow in panvel