राज्यात मध्यावधी शक्य, तयारी करा; उद्धव ठाकरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

राज्यात मध्यावधी शक्य, तयारी करा; उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यातील राजकीय संघर्षाला दिवसागणिक धार चढत असतानाच राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याचे भाकीत ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केले.

या अनुषंगाने नेते आणि कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या निर्णयांचा दाखला देत मध्यावधी निवडणुकांची शक्यता वर्तविल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. दुसरीकडे शिंदे गटाने मात्र त्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे.

राज्यातील आगामी निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीचा भाग म्हणून ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हा संपर्कप्रमुखांची विशेष बैठक शिवसेना भवनात घेतली. तिला राज्यभरातील नेते उपस्थित होते. शिंदे यांच्या बंडानंतरची पडझड, त्यानंतरची पक्ष बांधणी, सत्ताधारी विशेषत: ‘बाळासाहेबांची शिवसेने’च्या नेत्यांची भूमिका, त्यावरची व्यूहरचना या बाबींवर बैठकीत ठाकरे यांनी अन्य नेत्यांसोबत चर्चा केली.

मध्यावधी निवडणुकीचा मुद्दा उपस्थित करताना ठाकरे म्हणाले, ‘‘ राज्यातील उद्योग गुजरातमध्ये जात असून त्याकडे सत्ताधाऱ्यांचे काडीचेही लक्ष नाही. उद्योग-धंद्यातील त्यांची बनवाबनवी लपविण्यासाठी सव्वादोनशे कोटी रुपयांचा प्रकल्प राज्यासाठी जाहीर करण्यात आला. निवडणुकांच्या तोंडावर अशा घोषणा केल्या जातात.

केंद्र सरकारची ही चाल आहे, त्याचाच अर्थ निवडणुका कधीही होऊ शकतात. ही शक्यता लक्षात घेऊन त्यासाठी कामाला लागण्याची गरज आहे. या निवडणुकांना सामोरे जाताना लोकांची आणि संबंध राज्याची फसवणूक करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी लोकांपर्यंत पोचले पाहिजे.’’

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिर्डीतील मेळाव्यात कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्यासाठी तयारी करण्याचे आवाहन केले होते. काँग्रेसच्या गोटामध्ये निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केलेले विधान महत्त्वपूर्ण मानले जाते.