चक्क दीड लाख रुपयांचे वीज बील; महावितरणकडून तीन हप्त्यात रक्कम देण्याची सूचना

शर्मिला वाळुंज
Thursday, 17 September 2020

डोंबिवली एमआयडीसी मिलापनगर येथे राहणाऱ्या जेष्ठ नागरिक गौरी चौधरी यांना महावितरणकडून तब्बल दीड लाख रुपयांचे वीज बिल आले आहे.

ठाणे : डोंबिवली एमआयडीसी मिलापनगर येथे राहणाऱ्या जेष्ठ नागरिक गौरी चौधरी यांना महावितरणकडून तब्बल दीड लाख रुपयांचे वीज बिल आले आहे. सहा महिन्यांची सरासरी बिल भरुनही सप्टेंबर महिन्यात त्यांना एवढ्या मोठ्या रकमेचे बिल आल्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.  चौकशीसाठी ही महिला आणि तिचे पती महावितरण कार्यालयात चकरा मारीत आहेत, परंतु त्यांना तीन हप्त्यात वीज बिल भरा, असे एकच उत्तर देण्यात येत असल्याने एवढी रक्कम भरायची कोठून असा प्रश्न त्यांना पडला आहे. 

सर्वात मोठी बातमी : राज्यात साडेबारा हजार पदांसाठी पोलिस भरती होणार - अनिल देशमुख

गौरी चौधरी यांनी  या महिन्यातील वीज बिल ऑनलाईन पाहिले असता  रक्कम पाहून धक्काच बसला. बिलाची रक्कम तब्बल 1 लाख 47 हजार 250 रुपये आकारण्यात आले होते.  याप्रकरणी एमआयडीसीतील महावितरण कार्यालयात चौकशी केली असता तुमचे बिल बरोबर आहे. तीन समान हप्त्यात तुम्हाला ते भरावे लागेल असे उत्तर त्यांना महावितरण कर्मचाऱ्यांनी दिले. 
सुरुवातीचा अंदाजे 49 हजार रुपयांचा हप्ता भरणे सध्याच्या काळात शक्य नसल्याने चौधरी दांम्पत्य चिंतेत आहे. चौधरी यांच्याप्रमाणे मिलापनगर परिसरातच राहणारे ज्येष्ठ नागरिक अजय देसाई यांनाही महिन्याचे 70 हजार 140 इतके बिल आल्याने तेही चिंतेत आहेत. तेही महावितरणच्या कार्यालयात चकरा मारीत आहेत, परंतु त्यांनाही समान तीन हप्त्यात बील भरा असे उत्तर देण्यात आले आहे.

BMCतील समित्यांच्या निडणुकीत भाजपची भूमिका निर्णायक! विरोधकांची बार्गेनिंग पावर वाढणार

कुटूंबात केवळ तीन व्यक्ती त्यातही वीजेचा वापर जास्त नसताना एवढे बील येणे शक्यच नाही यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांना मीटर चेक करण्याविषयी विनंती केली असल्याची चौधरी यांनी सांगितले.

 

सुरुवातीला त्यांच्या मीटरचे रिडींग नीट झालेले नव्हते. त्यांनी त्यावेळीच युनीट जास्त पडत आहे की कमी याकडे लक्ष देणे गरजेचे होते. परंतू सुरुवातीला मीटर रिडींग नीट न झाल्यानेच सहा ते सात महिन्यांचे बिल त्यांना विभागून आलेले आहे. 
नरेंद्र धुवाड,
कार्यकारी अभियंता, कल्याण पूर्व विभाग

 

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electricity bill of Rs 1.5 lakh Instruction from MSEB to pay in three installments