थकबाकीदारांवर वीज कडाडणार!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

महावितरणनने आपली मोहीम तीव्र करत साडेचार हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

नवी मुंबई : वीजपुरवठ्याची बिले वेळेवर चुकती न करणाऱ्यांवर महावितरणतर्फे जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच कोकण प्रादेशिक विभागाची वीज थकबाकीदारांची रक्कम महावितरणने जाहीर केली. यात नवी मुंबई, पनवेल-उरणचा समावेश असलेल्या वाशी मंडळाची थकबाकी तब्बल 111 कोटींच्या घरात गेली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी वाशी मंडळातर्फे वीज खंडित करण्याच्या कारवाईला वेग आला आहे. आत्तापर्यंत वाशी मंडळातर्फे तब्बल साडेचार हजार ग्राहकांची वीज तोडण्यात आली आहे. 

महावितरणच्या वाढत्या वीजग्राहकांसोबत विजेच्या मागणीप्रमाणेच थकबाकीदारांचा आकडाही वाढत आहे. ही वाढती थकबाकी कमी करण्याच्या उद्देशाने महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम पाटील यांनी नुकताच कोकण प्रादेशिक विभागाचा आढावा घेतला. यात कोकण विभागाची तब्बल 944 कोटींची थकबाकी असल्याची आकडेवारी उघड झाली. तसेच मागील पाच महिन्यातील मंडळनिहाय आकडेवारीचा आढावा घेतला असता, भांडुप परिमंडळाची 320 कोटींची थकबाकी समोर आली आहे.

भांडुप परिमंडळांतर्गत येणाऱ्या वाशी मंडळाची 111 कोटींची थकबाकी असल्याचे स्पष्ट झाले. वाशी मंडळातर्फे नवी मुंबई महापालिका, ठाणे एमआयडीसी, तळोजा एमआयडीसी, पनवेल-उरण शहर व तालुका अशा तब्बल 8 लाख 75 हजार ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. परंतु गेल्या एप्रिल महिन्यापासून तब्बल 50 हजारपेक्षा जास्त ग्राहकांनी वीजदेयके चुकती केलेली नाहीत. यात चालू महिन्यातील काही थकबाकीदारांचा समावेश असून, त्यांच्याही 35 कोटींची भर या थकबाकीत पडली आहे.

पाच महिन्यांची थकबाकी वसूल करण्यासाठी वाशी मंडळातर्फे विभागनिहाय पथके तयार केली आहेत. वीज देयके न भरलेली आढळल्यास तत्काळ संबंधित ग्राहकाची वीज खंडित करण्याचे आदेश पथकांना देण्यात आले आहेत. वाशी मंडळाला वीज देयकातून महिन्याकाठी 250 कोटींचे उत्पन्न मिळते; परंतू एप्रिलपासून ग्राहकांनी वीज देयके न भरल्यामुळे 111 कोटींची थकबाकी राहिली आहे. 

धाबे दणाणले 

महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागातील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांकडील चालू देयकांची थकबाकी रखडल्याने वीजबिल थकवणाऱ्या ग्राहकांची वीज खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 90 टक्‍क्‍यांपेक्षा कमी वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा; तसेच महिनाअखेरपर्यंत सर्वात कमी वसुली करणाऱ्या कार्यकारी अभियंता व तत्सम अधिकाऱ्यांना निलंबित करा, असे आदेश सह-व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार पाटील यांनी दिले आहेत. पाटील यांच्या आदेशामुळे कमी वसुली असलेल्या अभियंत्यांचे धाबे दणाणले आहेत. 
 

ज्या ग्राहकांनी अद्याप मागील महिन्याची अथवा चालू देयके भरलेली नसतील त्यांनी ती तत्काळ भरून घ्यावीत. महावितरणच्या अधिकाऱ्यांना बिले न भरल्याचे आढळून आल्यास अशा ग्राहकांची वीज खंडित केली जाईल. 
- राजेश नाईक, अधीक्षक अभियंता, वाशी मंडळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electricity will be hit on the the people who do not pay bills