विमानतळ परिसरात खड्ड्यांचं साम्राज्य

वृत्तसंस्था
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे. मुंबईत झालेल्या अतीवृष्टीचा फटका रस्त्यांना बसला आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे. मुंबईत झालेल्या अतीवृष्टीचा फटका रस्त्यांना बसला आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाश्यांना खड्ड्यांतून दिव्य पार करत विमानतळ गाठावं लागत आहे. याविरोधात 'वॉचडॉग फाउंडेशन' या संस्थेने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे रीतसर तक्रार केली आहे.

अंधेरीतील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारा मुख्य रस्ता हा काँक्रिटचा असल्याने सध्या सुस्थितीत आहे.मात्र बाकी तीन रस्त्यांची खड्डयांमुळे दैना झाली आहे.अंधेरी-कुर्ला,घाटकोपर आणि साकिनाका परिसरातून तीन रस्ते विमानतळाच्या दिशेने येतात.हे तिनही डांबरी रस्ते आहेत.मुंबईत चार दिवस झालेल्या अतीवृष्टीपुढे हे रस्ते टिकाव धरू शकले नाहीत.टी 2 टर्मिनल, आणि एअर कार्गो कॉम्प्लेक्सकडे येणाऱ्या रस्त्यांवर तर शेकडो खड्डे आहेत. रस्त्यांवर असंख्य खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून वाहतूक कोंडीचा सामना ही करावा लागत आहे.

'वॉचडॉग फाउंडेशन'ने दिलेल्या माहितीनुसार भारत विमानतळ प्राधिकरणाने 26 एप्रिल 2006 रोजी केलेल्या करारानुसार विमानतळ,इमारती,बांधकाम आणि देखभाल करण्याची जबाबदारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे आहे.यामुळे विमानतळ परिसरातील रस्त्यांची देखभाल करण देखील त्याचीच जबाबदारी असल्याने त्यांनी त्यांच्या हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांची जबाबदारी घेणं आवश्यक आहे.एमआयएएल कंपनीसाठी जीव्हीके कंपनी काम पाहत असून या कंपनीने रस्त्यावरील खड्डे त्वरित भरण्याची मागणी 'इमेल'द्वारे करण्यात आली आहे.येत्या 48 तासात रस्त्यावरील खड्डे भरले नाहीत तर खड्डे पडलेल्या रस्त्यांचं 'जीव्हीके रेड्डी' मार्ग अथवा 'संजय रेड्डी' मार्ग असं नामकरण करण्याचा इशारा 'वॉचडॉग फाउंडेशन'चे ऍड.गॉडफ्राय पिंपेरा यांनी दिला आहे.

एमआयएएलकडून अवैध पार्किंग विरोधात 1200 रुपये दंड वसूल करण्यात येतो.तर पार्किंगसाठी प्रीमियम क्लास कडून प्रत्येक 2 मिनिटांसाठी ही 200 व सामान्य प्रवाश्यांकडून 100 रुपये वसूल केले जातात.याशिवाय प्रवाश्यांकडून युजर डेव्हलपमेंट फी म्हणून 10 हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक पैसे वसूल केले आहेत.इतके पैसे वसूल केल्यानंतर ही जर रस्त्यावरील खड्डे भरले जात नसतील तर संबंधित कंपनी विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

ऍड.गॉडफ्राय पिमेंटा - वॉचडॉग फाउंडेशन 

विमानतळ परिसरातच नाही तर संपूर्ण मुंबईत खड्डे आहेत.खड्डे भरण्यासाठी आवश्यक असणारा डांबर प्लांट बंद असल्याने डांबर उपलब्ध नाही.जेव्हा डांबर उपलब्ध होईल तेव्हा खड्डे भरू.- सुबोध भास्करन, लँड मॅनेजर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Empire of pits in the mumbai airport area