वीज कर्मचाऱ्यांना तत्वतः बोनस जाहीर; विश्वासात न घेतल्याने संप होणारच 

तेजस वाघमारे
Saturday, 14 November 2020

वीज कंपन्यातील कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे परंपरेनुसार बोनस देण्याबाबत ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी तत्वतः मान्यता दिलेली आहे

मुंबई : वीज कंपन्यातील कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे परंपरेनुसार बोनस देण्याबाबत ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी तत्वतः मान्यता दिलेली आहे. बोनसच्या रक्कमेबाबतची घोषणा येत्या तीन ते चार दिवसांमध्ये  व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून करण्यात येईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

दिवाळी उत्सवामध्ये वीज संघटनांनी ग्राहकांना त्रास होईल असे कृत्य करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. मात्र बोनसबाबत कामगार संघटनांसोबत कोणतीही चर्चा न झाल्याने संप होणारच असे, कामगार संघटनांच्या नेत्यांनी भूमिका घेतली आहे.

महत्त्वाची बातमी : शिक्षकांसाठी कोरोना चाचणीची सुविधा शाळेजवळ करा! शिक्षक संघटनेची मागणी

वीज कंपन्यांनी कामगारांना बोनस देता येणार नसल्याचे बैठकीत स्पष्ट सांगितल्यानंतर सर्व संघटनांनी एकत्रित येत एक दिवस संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार 14 नोहेंबरला राज्यातील 86 हजार वीज कामगार संपावर जातील, असा इशारा संघटनांनी दिला आहे. यानुसार 14 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजेपासून हा संप सुरू होउन रविवार 15 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजेपर्यंत संप चालेल. अशी घोषणा कामगार संघटनांनी केली होती.

मात्र कामगार संपावर जाण्याच्या काही तास अगोदरच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज कामगारांना तत्वतः बोनस देण्याची घोषणा केली आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत बाबत शुक्रवारी उर्जा मंत्री व प्रधान सचिव ऊर्जा तसेच तिन्ही कंपन्यांचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार बोनस देण्यास तत्वतः मान्यता दिलेली आहे. बोनसच्या रक्कमेबाबतची घोषणा येत्या तीन ते चार दिवसांमध्ये  व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून करण्यात येईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सर्व संघटनांना दीपावलीच्या उत्साही वातावरणामध्ये सर्व कर्मचारी संघटनांनी असे कुठलेही कृत्य करू नये, ज्यामुळे वीज ग्राहकांना त्रास होईल असे आवाहनही त्यांनी केले आहे.

महत्त्वाची बातमी मुंबईत एन-95 मास्कचा तुटवडा? किमतीवरील नियंत्रणामुळे कंपन्यांचा निर्मितीस नकार

मात्र, ऊर्जा मंत्र्यांनी कामगार संघटनांसोबत कोणतीही चर्चा न करता हा निर्णय घेतला आहे. याबाबत अद्याप आम्हालाही माहिती नाही. त्यामुळे कामगारांनी पुकारलेले नियोजित संप होईलच, असे महाराष्ट्र स्टेट इलेक्‍ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉ.कृष्णा भोयर यांनी शुक्रवारी रात्री सांगितले होते. 

( संपादन - सुमित बागुल )

energy minister declaired bonus for electricity companies but strike will occur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: energy minister declaired bonus for electricity companies but strike will occur