संतापलेल्या कर्जदाराने दुचाकीलाच लावली आग! बँकेचा वसूली कर्मचारीही घाबरून फरार

दीपक घरत
Tuesday, 29 September 2020

संतापलेल्य कर्जदाराने रागाच्याभरात आपल्या दुचाकीलाच आग लावण्याचा प्रकार शीव-पनवेल महामार्गावरील खारघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. 

पनवेल : कर्जदार आणि वसुली कर्मचाऱ्यांमध्ये वारंवार खटके उडत असल्याच्या घटना पुढे येत असतानाच, सोमवारी (ता. 28) चक्क वसुली कर्मचाऱ्यांनी कर्जदाराचा पाठलाग करून रस्त्यावर अडवण्याचा प्रकार घडला. त्यामुळे संतापलेल्य कर्जदाराने रागाच्याभरात आपल्या दुचाकीलाच आग लावण्याचा प्रकार शीव-पनवेल महामार्गावरील खारघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. 

महाड ग्रामीण रुग्णालयात कोविड केंद्राच्या दुरुस्तीसाठी शासनाने तातडीने निधी द्यावा, भाजपची मागणी

कोरोनामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या मागे आता बँकेचे वसुली कर्मचारी हात धुवून लागले आहेत. आता पाठलाग करून रस्त्यात अडवण्याचा प्रकारही वसुली कर्मचारी करत आहेत. संतापलेल्या कर्जदाराने दुचाकीला आगीच्या भक्ष्यस्थानी देताच तेथून पसार झाला. या वेळी बँकेचे वसुली कर्मचाऱ्यानेही तेथून काढता पाय घेतला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या खारघर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनेची माहिती खारघर पोलिस ठाण्यात दिली. मात्र, खारघर पोलिस ठाण्यात याबाबत कोणत्याही प्रकारची नोंद करण्यात आली नाही, असे उत्तर पोलिस कर्मचाऱ्यांनी दिले आहे.

दुचाकी नोंदणी क्रमांकावरून शोध सुरू
दुचाकीवर असलेल्या नोंदणी क्रमांकावरून गाडीमालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई प्रादेशिक परिवहन विभागात दुचाकीची नोंदणी करताना दिलेला मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता, तो बंद असल्याचे निदर्शनास आले.

सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलल्या; कोरोनापरिस्थितीमुळे सरकारचा आदेश

'सकाळ'ने या आधीच माहिती दिली
'कर्जवसुलीसाठी वाहन जप्तीचा फंडा' या शीर्षकाखाली  4 सप्टेंबर रोजी 'सकाळ' मध्ये वृत्त छापले होते. यात बँकेचे वसुली कर्मचारी कशा पद्धतीने रस्त्यावर उभे राहून कर्जदाराचा माग घेतात; तसेच खारघर टोलनाका येथे हा प्रकार सुरू असल्याबाबत सविस्तर माहिती दिली होती.

 

घटनेची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे की नाही, याबाबत माहिती घेतो. 
- प्रदीप तिदार,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक,
खारघर पोलिस ठाणे

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The enraged borrower set his bike on fire in kharghar