लोकल सुरु झाल्याने वसई विरारच्या महिला प्रवाशांमध्ये उत्साह; वेळेत बदल करण्याची मागणी

प्रसाद जोशी
Wednesday, 21 October 2020

वसई विरारमध्ये जीवनवाहिनी सुरु झाल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले असले तरी काही महिलांनी रेल्वेने वेळेत बदल करावा अशी मागणी केली आहे.

वसई - लॉकडाऊन झाल्यापासून लोकल बंद होत्या त्यानंतर हळूहळू शिथिल केल्यावर एसटीने कामावर जाण्यासाठी 2 ते 3 तास खडतर प्रवास आणि त्यातून होणारी दमछाक महिलांसाठी तरी थांबली आहे,वसई विरारमध्ये जीवनवाहिनी सुरु झाल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले असले तरी काही महिलांनी रेल्वेने वेळेत बदल करावा अशी मागणी केली आहे.

रायगडात पाच दिवसात आढळले चौदा हजार गंभीर आजाराचे रुग्ण; आरोग्य सर्वेक्षणात आढळली धक्कादायक माहिती

वसई विरार, नालासोपारा , नायगाव स्थानकातून रोज लाखो प्रवासी नोकरी, व्यवसायानिमित्त लोकलने प्रवास करतात.नेहमीच वर्दळ असणाऱ्या रेल्वे परिसरात लॉकडाऊन पासून शुकशुकाट होता. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लोकल धावली परंतु सर्वसामान्य प्रवाशांसाठी दारे उघडली न गेल्याने नाराजगी निर्माण होऊन लोकल सुरु करण्याची मागणी जोरात धरू लागली.

एसटीने मुंबईकडे जाण्यासाठी मर्यादित बसेस आणि प्रवाशांची संख्या जास्त असल्याने खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. एकीकडे कामावर जाण्यासाठी व पुन्हा परतीचा मार्ग धरताना तब्बल दोन ते तीन तासाचा प्रवास करावा लागत असल्याने नागरिक हैराण झाले.संसाराचा गाढा हाकतांना आर्थिक हातभार लावण्यासाठी महिला अनेक क्षेत्रात नोकरी करत आहेत परंतु धकाधकीच्या जीवनात कोरोनामुळे अनेक संकटे येऊन ठेपली त्यात नोकरीसाठी होणारी प्रवासाची चिंता सतावत असताना महिलांसाठी लोकल सुरु करण्यात आली असल्याने वसई विरारमधील महिलांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

पोस्ट कोविड आरोग्यविषयक तक्रारी वाढल्या, रूग्णालयांचा ‘रिकव्हरी क्लिनिक’वर भर

महिलावर्गाने (ता. 21 ) सकाळी कामावर जाण्यासाठी रेल्वेकडे धाव घेतली.यावेळी वसई विरारमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.कोरोनाचे नियम पाळा , रांगेत या अशा घोषणा रेल्वेकडून करण्यात येत होत्या.काही महिलांनी मात्र वेळेबाबत नाराजगी व्यक्त केली.कार्यालयाची आणि रेल्वेची वेळ यात तफावत असल्याने त्यात बदल करावा अशी मागणी केली जात आहे नवरात्री दरम्यान सरकारने भेट देऊन प्रवास सुखाचा आणि कमी वेळेत होणार असल्याचे देखील म्हणणे काही महिलांनी मांडले.

 

रेल्वे सुरु नव्हती त्यामुळे एसटी किंवा खाजगी वाहनाने मुंबईकडे जावे लागत होते. पैसा आणि वेळ अधिक लागत होता त्यात देखील मर्यादित प्रवासी असल्याने लांबच्या लांब रांगा लागत असल्याने घरातून 1 तास आगोदर बससाठी यावे लागत होते.रेल्वे सुरु झाल्याने दिलासा मिळाला आहे.
साधना मेजारी  -
महिला प्रवासी , विरार 

 

कार्यालय ज्यावेळी सुरु झाले तेव्हापासून लोकल बंदच होती.कामावर न गेल्यास नोकरी जाईल ही भीती असल्याने जे वाहन मिळेल त्यातून प्रवास केला.लोकल सुरु झाली याचा आनंद आहे मात्र कार्यालयाची वेळ पाहता रेल्वेने वेळापत्रकात बदल केला पाहिजे. सकाळी 7 पासून महिलांसाठी लोकल सुरु ठेवावी.
वनिता पांडे  -
महिला प्रवासी , वसई.

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Enthusiasm among female passengers of Vasai Virar due to local launch