शिवसेनेच्‍या दुटप्पी भूमिकेवरून नाराजी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

मेट्रो कारशेडसाठी आरेतील झाडांची कत्तल करण्यास शिवसेनेने विरोध करूनही पंतप्रधानांच्या हस्ते झालेल्या मेट्रो भवनाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हजर राहिल्याने आरे वाचवा मोहिमेचे कार्यकर्ते संताप व्यक्त करीत आहेत.

मुंबई - मेट्रो कारशेडसाठी आरेतील झाडांची कत्तल करण्यास शिवसेनेने विरोध करूनही पंतप्रधानांच्या हस्ते झालेल्या मेट्रो भवनाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हजर राहिल्याने आरे वाचवा मोहिमेचे कार्यकर्ते संताप व्यक्त करीत आहेत. हे भूमिपूजन अवैध असल्याचा दावाही केला जात आहे.  

गेल्या चार वर्षांपासून आरेतील प्रस्तावित मेट्रो तीनच्या प्रकल्पाला आरे वाचवा मोहिमेतर्फे विरोध दर्शवला जात आहे. आता मुंबई परिसरातील मेट्रोच्या नियंत्रणासाठी मेट्रो भवनही आरेतच उभारले जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींच्या संतापात भर पडली आहे. शिवसेना आरेतील मेट्रो प्रकल्पाच्या विरोधात असताना उद्धव ठाकरे भूमिपूजनासाठी हजर राहणे हे आमच्यासाठी धक्कादायक असल्याची टीका आरे वाचवा मोहिमेच्या झोरू बाथेना यांनी केली. अखेर ठाकरे हे राजकारणीच असल्याचे सिद्ध झाले, अशा शब्दांत बाथेना यांनी टीका केली.

अवैध कृत्यांमध्ये पंतप्रधान सहभागी?
हे भूमिपूजनच मुळात अवैध असल्याची टीका भट्टाचार्य यांनी केली. पंतप्रधान या अवैध कृत्यांमध्ये सहभाग घेत असतील, तर भविष्यात कायदे व नियमांचे कोणालाही भय राहणार नाही, या शब्दांत अमृता भट्टाचार्य यांनी संताप व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Environmentalists claim that land-worship of the metro building is illegal