मुंबई : मेट्रो कारशेडसाठी 'आरे'तील 2700 झाडे तोडण्यास परवानगी; पर्यावरणप्रेमींची निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

आरेच्या जंगलात होणाऱ्या मेट्रो कारशेडसाठी 2700 झाडे तोडण्यास परवानगी देण्याच्या वृक्ष प्राधिकरणाच्या निर्णयाविरोधात आज पर्यावरणप्रेमी नागरिकांनी आरे कॉलनीमध्ये जोरदार निदर्शने केली.

मुंबई : आरेच्या जंगलात होणाऱ्या मेट्रो कारशेडसाठी 2700 झाडे तोडण्यास परवानगी देण्याच्या वृक्ष प्राधिकरणाच्या निर्णयाविरोधात आज पर्यावरणप्रेमी नागरिकांनी आरे कॉलनीमध्ये जोरदार निदर्शने केली. दोन दिवसांपूर्वी वृक्ष प्राधिकरणाने वरील निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ आज पर्यावरणप्रेमी नागरिक आणि संघटनांनी आरे कॉलनीतील पिकनिक पॉईंटजवळ एकत्र येऊन जोरदार घोषणा देत निदर्शने केली.

आंदोलकांच्या हाती विविध घोषणा लिहिलेले फलक होते. यावेळी प्रतिकात्मक चिपको आंदोलनही करण्यात आले. यानिमित्ताने पर्यावरणप्रेमींनी ट्विटरवर देखील प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध करणाऱ्या ट्विटचा पाऊस पडला. या निर्णयावेळी तटस्थ भूमिका घेणाऱ्या काँग्रेस पक्षावरही या ट्विटमध्ये सडकून टीका करण्यात आली.

मुंबईतील उरलेल्या शेवटच्या जंगलांवर कुऱ्हाड चालवली जात असताना अॅमेझॉनच्या जंगलातील आगीबाबत चिंता व्यक्त करण्याचे आपल्याला कारणच काय, अशी उपहासात्मक टीकाही केली जात होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Environmentalists protest against tree cutting in Aare forest In Mumbai