पावसाळी साहित्य खरेदीत दुजाभाव मिटला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

नवी मुंबई महापालिकेतर्फे पावसाळ्यात क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या साहित्य भत्त्यांमध्ये आता महिलांनाही पुरुष कर्मचाऱ्यांएवढाच साहित्य भत्ता दिला जाणार आहे.

नवी मुंबई : महापालिकेतर्फे पावसाळ्यात क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या साहित्य भत्त्यांमध्ये आता महिलांनाही पुरुष कर्मचाऱ्यांएवढाच साहित्य भत्ता दिला जाणार आहे. ८ जुलैला भांडार विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार पुरुष व महिला कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भत्त्यांमध्ये भेदभाव केला होता. याबाबत आरोग्य विभागातील महिलांनी महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा दिला होता. या अन्यायाला ‘सकाळ’ने बातमी प्रकाशित करून वाचा फोडली होती. अखेर त्याची दखल घेत प्रशासनाने ९ सप्टेंबरला सुधारित पत्रक काढून महिलांनाही पुरुषांप्रमाणेच साहित्य भत्ते लागू केले आहेत.  

महापालिकेच्या आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागात तब्बल दीड हजार महिला क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमध्ये कार्यरत आहेत. स्वच्छता निरीक्षक, उपस्वच्छता निरीक्षक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, परिचारिका, आरोग्य सहायक महिला, सफाई कामगार, आळी बहुउद्देशीय सेवक आदी पदावर महिला कर्मचारी कार्यरत आहेत. पावसाळ्यात बाहेर फिरून काम करायचे असल्याने पालिकेतर्फे महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना गमबूट, रेनकोट, चप्पल व छत्री साहित्यांऐवजी रक्कम दिली जाते. संबंधित कर्मचाऱ्यांनी साहित्य खरेदी करून तेवढ्या किमतीची बिले प्रशासनाकडे सादर करून देयके घ्यायची असतात. मात्र, स्वच्छता निरीक्षक पदावरील पुरुषाला गमबूट व रेनकोट खरेदीसाठी पालिका एक हजार ७९५ रुपये देते; तर स्वच्छता निरीक्षक या पदावरील महिला कर्मचाऱ्यांना गमबूट व रेनकोट न देता चप्पल व छत्री खरेदीसाठी पालिकेने अवघी ६९९ रुपयांच्या भत्त्याची तरतूद केली होती. 

उद्यान सहायक पदावरील महिलेलाही चप्पल व छत्री खरेदी करण्यासाठी निधी दिला जात नव्हता. साहित्य वाटपात प्रशासनाकडूनच स्त्री-पुरुष भेदभाव होत असल्यामुळे सहकारी कर्मचाऱ्यांकडून समानतेची वागणूक कशी मिळणार, असा प्रश्‍न काही महिला कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला होता. याबाबत ‘सकाळ’ने या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर प्रशासनाने महिलांना पुरुषांप्रमाणेच स्वच्छता निरीक्षक पदापासून ते उपस्वच्छता निरीक्षक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, परिचारिका, आरोग्य सहायक कर्मचारी व उद्यान सहायक पदावर कार्यरत महिला कर्मचाऱ्यांसाठी रेनकोट व चप्पल खरेदीसाठी एक हजार १४९ रुपयांचा भत्ता मंजूर केला आहे. 

पावसाळी साहित्य खरेदीसाठी दिल्या जाणाऱ्या रकमेत भेदभाव होत असल्याने आरोग्य विभागातील काही महिलांनी लेखी निवेदन देऊन प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली होती. महिलांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात इंटकशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र कर्मचारी युनियनने आंदोलनाचा इशारा दिला होता; मात्र आता प्रशासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतल्यामुळे नवे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे आभार. 
- रवींद्र सावंत, अध्यक्ष, महाराष्ट्र कर्मचारी युनियन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Equal allowances to women employees in the Municipal Health Department in navi mumbai