ओला ऍपच्या जीपीएस यंत्रणेत फेरफार करून प्रवाशांची लूट; तिघे पोलिसांच्या ताब्यात

ओला ऍपच्या जीपीएस यंत्रणेत फेरफार करून प्रवाशांची लूट; तिघे पोलिसांच्या ताब्यात

मुंबई ः ओला ऍप्लिकेशनच्या अनअपडेटेड व्हर्जनमधील जीपीएस यंत्रणेचा गैरवापर करून जास्ती भाडी आकारणाऱ्या मुख्य आरोपी चालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी हे ऍप्लिकेशन 50 हून अधिक ओलाचालकांना विकल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःहून त्याची पडताळणी करून आरोपींना अटक केली. 

मुंबई विमानतळावरून नेरूळ, सानपाडा, खारघर, कामोठे, कळंबोली व पनवेल यांसारखी दूरच्या ठिकाणची भाडी घेऊन प्रवाशांकडून अधिकचे भाडे घेतले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-एकच्या पोलिसांना मिळाली होती. एवढ्या मोठ्या कंपनीच्या ऍप्लिकेशनमध्ये छेडछाड करणे अशक्‍य गोष्ट आहे. मग त्यानंतरही आरोपी प्रवाशांची फसवणूक कसे करत आहेत, त्याची पडताळणी करण्यासाठी कक्षाचे प्रभारी पोलिस निरीक्षक विनायक मेर यांच्या मार्गदर्शनाखाली काही डमी प्रवासी विमानतळावर पाठवले. त्यांनी जाणूनबुजून पनवेलसारख्या दूरच्या ठिकाणी प्रवास केला. त्या वेळी पडताळणीत दोन ओलाचालकांनी अधिक किलोमीटरचा प्रवास झाल्याचे यंत्रणेत दाखवले. त्यानंतर असा गैरप्रकार सुरू असल्याची पोलिसांची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी अखेर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार चालकासह तीन चालकांना अटक केली. 

अशी सुचली कल्पना 
याबाबत माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्य आरोपींच्या चौकशीत हा सर्व प्रकार उघड झाला. आरोपीच्या मोबाईलमध्ये ओलाचे जुने व्हर्जन ऍप्लिकेशन होते. त्या वेळी अपघाताने एकदा त्याच्याकडून ऍप्लिकेशन बंद झाल्यानंतर प्रवासाचे किलोमीटर वाढल्याचे त्याच्या लक्षात आले; पण डिसेंबर 2019 मध्ये ओलाने हे ऍप्लिकेशन अपडेट केले; पण आरोपी चालकाने त्याच्या मोबाईलमधील ऍप्लिकेशनचे व्हर्जन अपडेट केले नाही. काही कालावधी मोबाईल बंद ठेवल्यानंतर जुने व्हर्जनही चालत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर तो वारंवार किलोमीटर वाढवून प्रवाशांची फसवणूक करू लागला. येवढ्यातच त्याचे भागले नाही. त्यानंतर त्याने आपण स्वतः हे सॉफ्टवेअर बनवल्याचा दावा करून 50 हून अधिक ओलाचालकांना तीन-चार हजार रुपयांना विकलेही आहे. 

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com