रायगडमध्ये रेशन कार्ड मिळूनही अंत्योदय, अन्न सुरक्षेचे धान्य देण्यास टाळाटाळ

प्रमोद जाधव
Monday, 16 November 2020

शिधावाटपाबाबत पारदर्शकता असावी, यासाठी सरकारने ऑनलाईन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला; परंतु त्याचा फटका रायगड जिल्ह्यातील पाच टक्के नागरिकांना बसला आहे.

अलिबाग : शिधावाटपाबाबत पारदर्शकता असावी, यासाठी सरकारने ऑनलाईन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला; परंतु त्याचा फटका रायगड जिल्ह्यातील पाच टक्के नागरिकांना बसला आहे. त्यांची ऑनलाईन नोंदणी नसल्याने ते अन्नधान्यापासून वंचित आहेत. 

हेही वाचा - सिद्धिविनायकला क्यूआर कोड तर महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाही

एकही नागरिक अन्नधान्यापासून वंचित राहू नये, यासाठी सरकारने शिधावाटप करण्यासाठी ऑनलाईन सेवा सुरू केली. त्यासाठी रेशन कार्डाला आधार लिंक करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी जिल्ह्यातील ग्राहकांना रेशन दुकानांमध्ये आणि तालुक्‍यातील पुरवठा निरीक्षण कार्यालयात आधार लिंक करण्याची सोय करण्यात आली. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यात 95 टक्के ग्राहकांचे आधार लिंक झाल्याने त्यांना धान्य देण्यास प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली; परंतु पाच टक्के ग्राहकांनी आधार लिंकसाठी प्रक्रिया करूनही त्याची नोंदणी झाली नाही. त्यामुळे या पाच टक्के ग्राहकांना धान्य मिळण्यास अडचण येऊ लागली. अंत्योदय, अन्न सुरक्षेचा लाभ मिळण्यासाठी रेशन कार्ड उपलब्ध असताना, ऑनलाईन नोंदणीच्या अभावामुळे त्यांना अधिक रक्कम भरून धान्य घेण्याची वेळ आली आहे. 

 

निराधार, अपंगांना शासनाने रेशन कार्डवाटप केले आहेत; परंतु इष्टांक संपल्याने या लाभार्थ्यांना अंत्योदय, अन्न सुरक्षेचा लाभ मिळत नाही. तसेच ज्यांनी ऑनलाईन करून त्याची मशीनवर नोंदणी नाही. त्यांना 8 - 12 रुपयांना धान्य खरेदी करावे लागत आहेत. त्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे. 
- दीपक पाटील,
सामाजिक कार्यकर्ते 

 

सरकारच्या सूचनेनुसार ऑनलाईन नोंदणीद्वारे धान्यवाटप केले जाते. कोणीही धान्यापासून वंचित राहू नये, यासाठी ऑफ लाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सरकारच्या इष्टांकाप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने धान्यवाटप केले जाते. जे कोणी वंचित राहत असतील, त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केला जाईल. 
- मधुकर बोडके,
जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड 

Even after getting ration card in Raigad, Antyodaya refrained from providing food security

--------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Even after getting ration card in Raigad, Antyodaya refrained from providing food security