
दादर येथे शिवकालीन शस्त्रास्त्रे, नाण्यांचे प्रदर्शन
प्रभादेवी : इतिहासकाळात बुद्धी तल्लख व्हावी, मानसिक स्थिती सक्षम राहावी, यासाठी युद्धाला जाण्याअगोदर बुद्धीला चालना देणारे बैठे खेळ खेळले जात असत. अशा विविध बैठ्या खेळांचे एक अनोखे प्रदर्शन दादरमध्ये भरले असून नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. इतिहासाचा वेध घेणारे शिवकालीन शस्त्रास्त्रे, नाणी व बैठे खेळ यांचे सुंदर आणि माहितीपूर्ण प्रदर्शन दादरच्या शिवाजी मंदिर येथील शाहू सभागृहात भरवण्यात आले आहे. बुधवार (ता. ४) पर्यंत नागरिकांना ते पाहता येणार असल्याची माहिती आयोजक आशिष कदम यांनी दिली. या प्रदर्शनातील या खेळांच्या विभागात अनेक जण रमलेले पाहायला मिळाले.
मनोरंजनासोबत युद्धासाठी खेळांचा कसा उपयोग होत होता, याची माहिती खेळ अभ्यासक पंकज भोसले यांनी दिली. दगडावर कोरलेल्या खेळापासून ते अगदी लाकूड, कपडे आदींवर हे खेळ बनवले गेले. मंकला, विमानाम, चतुरंग, अक्स दुता, गंजिफा, कवड्या असे खेळ खेळले जात असत. ते खेळ या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत.
दरम्यान, गेली २२ वर्षे सुनील कदम यांनी जतन केलेली शिवकालीन शास्त्रास्त्रे, नाणी, तोफ गोळे, भाले, वाघनखे, तलवारी यांचे प्रदर्शनही एक वेगळा अनुभव देणारे आहे.
आजच्या मोबाईलच्या युगात मुलांच्या दृष्टीवर परिणाम होताना दिसून येत आहे. त्यांच्या जडणघडणीवर बदल होताना दिसत आहे. त्यामुळे मुलांनी अशा जुन्या बैठ्या खेळांकडे वळल्यास त्यांचा बौद्धिक विकास घडेल, त्यांची विचारशक्ती वाढेल, त्यांनी एखादा खेळ स्वतः बनविल्यास त्यांची कल्पकता दिसून येईल. त्यामुळे अशा खेळांचा त्यांना नक्कीच उपयोग होऊ शकेल.
- पंकज भोसले, ऐतिहासिक खेळांचे अभ्यासक
-रजनीकांत साळवी
Web Title: Exhibition Shivakalin Weapons Coins At Dadar Curiosity About Historical Sitting Games
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..