Fake TRP Case: पार्थो दासगुप्ता यांची प्रकृती स्थिर,आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश

सुनीता महामुणकर
Monday, 25 January 2021

फेक टीआरपी प्रकरणातील प्रमुख आरोपी पार्थो दासगुप्ता यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात आज देण्यात आली.

मुंबई: फेक टीआरपी प्रकरणातील प्रमुख आरोपी पार्थो दासगुप्ता यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात आज देण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातील आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे माजी सीईओ दासगुप्ता यांनी प्रकृतीच्या कारणावरुन तातडीने जामीन मिळण्यासाठी न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेवर आज न्या पी डी नाईक यांच्या पुढे सुनावणी झाली. या प्रकरणातील सर्व आरोपी जामीनावर आहेत. तसेच दासगुप्ता यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना उपचारांची गरज आहे, असे त्यांचे वकील शार्दुल सिंह यांनी सांगितले. मात्र त्यांच्यावर तळोजा कारागृहात जे जे रुग्णालयाप्रमाणे उपचार सुरू आहे, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या प्रकरणात अन्य आरोपी कोण आहेत असा प्रश्न न्यायालयाने विचारला. यावर रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आहेत, असे सिंह यांनी सांगितले. या प्रकरणाची आरोपपत्र आणि सत्र न्यायालयाने दासगुप्ता यांना जामीन नाकारल्याच्या आदेशाची प्रत दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच दासगुप्ता यांच्या उपचाराबाबत पोलिसांनी केलेले विधान न्यायालयाने नोंदवून घेतले. जर रुग्णालयात दाखल करायचे असेल तर जेजे शासकीय रुग्णालयात दाखल करावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले. याचिकेवर पुढील सुनावणी 2 फेब्रुवारीला होणार आहे.

हेही वाचा- युती सरकार काळातील कामे बंद करायची का? एकनाथ शिंदेंचा भाजपला प्रतिसवाल

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Fake TRP case Partho Dasgupta stable condition bombay High Court directed file chargesheet


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fake TRP case Partho Dasgupta stable condition bombay High Court directed file chargesheet