भातकापणीसाठी शेतकरी करताहेत पाऊस थांबण्याची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

पावसाळ्यात होणारी तालुक्‍यातील भातशेती कापणीसाठी तयार झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पाऊस थांबण्याची प्रतीक्षा लागली आहे.

माणगाव (बातमीदार) : पावसाळ्यात होणारी तालुक्‍यातील भातशेती कापणीसाठी तयार झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पाऊस थांबण्याची प्रतीक्षा लागली आहे. पावसाची उघडीप झाली तरच भातभेती कापणीला सुरुवात होईल, अन्यथा पीक वाया जाईल, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्‍त होत आहे.

भातशेतीने समृद्ध असलेल्या माणगाव तालुक्‍यात १२ हजार ५०० हेक्‍टर पावसाळी भातपिकाची लागवड झाली आहे. जून महिन्यात चांगली सुरुवात केलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची लावणीची कामे अगदी वेळेत पूर्ण झाली होती. मात्र, सतत पडणाऱ्या धुवाधार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान केले. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झालेला पाऊस सप्टेंबर महिना संपत आला, तरी थांबला नाही. भातशेती साधारणपणे १०० दिवसांत कापणी योग्य होते. त्यामुळे जूनच्या अखेरीस लागवड झालेली भातशेती लोम्बीमध्ये आली आहे. 

पाऊस थांबल्यास १० ते १५ दिवसांत ती कापणीसाठी योग्य होईल. अगोदरच भातपिकास पावसाने झोडपले असून, भाताला पलज आली आहे. लोम्बी काळ्या पडल्या आहेत. साधारणपणे तालुक्‍यातील शेतकरी पितृपक्षानंतर भातकापणीस सुरुवात करतात. यावर्षी मात्र पितृपक्ष संपत आला, तरी पावसाने उघडीप दिली नाही. त्यामुळे हातात आलेले पीक वाया जाईल की काय? अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत त्यामुळे पाऊस थांबण्याची प्रतीक्षा शेतकरी करत आहे.

अगोदरच पावसाने शेतीचे नुकसान केले आहे. आता हाताशी आलेले पीक वेळेवर कापले नाही तर ते पीक हातातून जाईल. त्‍यामुळे पाऊस जाण्याची वाट पाहत आहोत.
- चंदर पवार, शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers are waiting to stop the rain for rice cutting