मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र पित्याला तुरुंगवास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र पित्याला 10 वर्ष तुरुंगवास

ठाणे (बातमीदार) : अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार करणाऱ्या सावत्र पित्याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पॉस्को विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती के. डी. शिरभाते यांनी दोषी ठरवून 10 वर्षे तुरुंगवास आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी सावत्र पित्याने मुलीच्या प्रियकरावरच अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यास मुलीस भाग पाडले होते. मात्र, सुनावणीदरम्यान पीडित मुलीने पित्याचे खरे रूप उघड केल्याने खटल्याला कलाटणी मिळून अत्याचारी पित्याच्या कृत्याचा भांडाफोड झाला. या खटल्यात सरकारी वकील म्हणून विनीत कुलकर्णी यांनी काम पाहिले.

नवी मुंबईतील वाशी येथे राहणारा 37 वर्षीय आरोपी सावत्र पिता पेशाने मजूर आहे. वाशी पोलिस ठाण्यात साबीर खान या पीडित मुलीच्या प्रियकराविरोधात पीडित मुलीच्या अपहरणाचा आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. 2016 मध्ये हा खटला न्यायालयात सुरू असतानाच फिर्यादी पीडित मुलीने न्यायालयात साक्ष देताना अत्याचार करणारा साबीर खान नसून अत्याचारी तिचा सावत्र बाप असल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली होती.

पीडितेच्या न्यायालयातील वक्तव्यावरून पॉस्को न्यायालयाने पीडित मुलीच्या सावत्र बापावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्याच खटल्याचा निकाल गुरुवारी न्यायालयात लागला. या खटल्यात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या निकालाच्या आधारे आरोपी पित्या विरोधातील साक्षीपुरावे ग्राह्य धरीत त्याला 10 वर्षांचा तुरुंगवास आणि चार हजारांचा दंड अशी शिक्षा गुरुवारी ठोठावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: father abusing daughter