मुंबई पालिकेच्या आरोग्यसेविकांची निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

मुंबई पालिकेच्या आरोग्यसेविकांचा मागण्यांसाठी आझाद मैदानात ठिय्या. पालिकेविरोधात घोषणाबाजी...

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी महापालिकेच्या तब्बल चार हजार महिला आरोग्यसेविकांनी सोमवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. पालिका सेवेत सामावून घेण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. २० वर्षांपासून चार हजार आरोग्यसेविका आपल्या हक्कासाठी लढा देत आहेत; परंतु महापालिका आमचे शोषण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

एक ते पाच हजार रुपयांच्या मोबदल्यात सार्वजनिक आरोग्यासंबंधीची कामे आरोग्यसेविकांकडून करून घेतली जातात. रोज किमान पाच तास त्यांना काम करावे लागते. मात्र, त्या कर्मचारी नसून स्वयंसेविका आहेत, असे कारण पुढे करून त्यांना कोणतीही सुविधा देता येणार नाही, असे सांगितले जाते. त्याबद्दल आरोग्यसेविकांनी धरणे आंदोलनात संताप व्यक्त केला.

किमान वेतन कायदा १९४८ नुसार वेतन देणे, भविष्य निर्वाह निधी व निवृत्तिवेतन कायद्याची अंमलबजावणी करावी, प्रसूती रजा बाल संगोप विषयक फायदे देणे आदी मागण्या आरोग्यसेविकांनी पालिका प्रशासनाकडे केल्या आहेत. मागण्यांचा सहानभूतीने विचार करुन पालिकेने लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा, असे आरोग्यसेविकांनी म्हटले आहे.  

मागण्या मान्य व्हायलाच हव्यात
पालिका कर्मचारी नेते प्रकाश देवदास म्हणाले, की पालिका आरोग्यसेविकांना पाच हजारांचे वेतन देऊन त्यांचे शोषण करीत आहे. त्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Female Health workers of BMC staged a protest for their demands